नेवासा – नेवासा परिसरातील लाडमोड टेकडी ही पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असून, या भागात विविध कालखंडातील संस्कृतींचे अस्तित्व आढळते, असे प्रतिपादन डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे प्रा. डॉ. सतीश नाईक यांनी केले. ते संत ज्ञानेश्वर मंदिर, नेवासा येथे आयोजित “नेवाशाची प्राचीन संस्कृती” या विषयावरील कार्यक्रमात बोलत होते.

प्रा. नाईक यांनी सांगितले की, प्रवरा नदीकाठच्या जोर्वे व दायमाबाद ही एकाच संस्कृतीची पुरातत्त्वीय स्थळे असताना, नेवासा हे बहुसांस्कृतिक वैशिष्ट्य असलेले ठिकाण आहे. अश्मयुगीन, ताम्रपाषाण आणि सातवाहनकालीन संस्कृतींचे अवशेष येथे आढळतात, त्यामुळे या परिसराचा सखोल अभ्यास आवश्यक आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के होते. यावेळी जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, रामकृष्ण विवेकानंद आश्रमचे ब्रह्मचारी ज्ञानेश्वर महाराज, गोपाल महाराज आवकाळे तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक शंतनू हापसे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी मध्ययुगीन कालखंडातील ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र आणि शिवभारत या ग्रंथांच्या निर्मितीशी नेवासा गावाचा घनिष्ठ संबंध असल्याचे सांगत, मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या उभारणीत नेवास्याचे स्थान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.
वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के यांनी संत ज्ञानेश्वरांनी नेवासा क्षेत्राच्या पावित्र्याचे केलेले वर्णन अधोरेखित करत, या भूमीचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्याचे आवाहन केले. तसेच, चार हजार वर्षांपूर्वीची लाडमोड संस्कृती येथे अस्तित्वात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

संचालक शंतनू हापसे यांनी अंधश्रद्धा टाळून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज व्यक्त करत, इतिहास व पुरातत्त्वशास्त्र हे समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. डॉ. सतीश नाईक यांनी भविष्यात नेवासा परिसरात अधिक संशोधन करण्याची तयारी दर्शवली, तर प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी लाडमोड टेकडीवर पुरातत्त्वीय उत्खनन व्हावे, अशी मागणी केली.
कार्यक्रमाचे आयोजन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा. देविदास साळुंके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजय सुकाळकर यांनी केले. कार्यक्रमास विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







