
नेवासा- तालुक्यासह परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, यंदा अधिक मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विवाहाचे मुहूर्त अत्यंत मर्यादित आहेत. परिणामी, एकाच मुहूर्तावर शेकडो विवाह सोहळे पार पडत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते आणि मुख्य महामार्ग वाहनांनी ओसंडून वाहत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पूर्वी वाहतूक कोंडीची समस्या केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती. आता मात्र नेवासा फाटा, कुकाना, घोडेगाव, सोनई आणि नेवासे शहरात दोन-दोन तास वाहनांच्या रांगा लागत आहेत.

भर उन्हाळ्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेलेले असताना, लग्न समारंभ आटोपून बाहेर पडणारी हजारो वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने कोंडीत अधिक भर पडत आहे. विशेष म्हणजे महामार्गावर ना ट्रॅफिक पोलीस दिसतात, ना महामार्ग पोलिसांचा प्रभावी वावर जाणवत आहे. नागरिक आणि वाहनचालक उन्हात होरपळत असताना संबंधित कर्मचारी सावली शोधून बसल्याचे चित्र दिसत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शुक्रवारचा घोडेगाव बाजार तसेच रविवारचा सोनई आणि नेवासा बाजाराच्या दिवशी जर लग्नाचा मुहूर्त असेल, तर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. या कोंडीत रुग्णवाहिका, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवा देणारी वाहने तासनतास अडकून पडत आहेत.
मंगल कार्यालयांना परवानगी देताना पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाच्या अटी घातल्या जातात, मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नेवासेकर उपस्थित करत आहेत.
लग्नसराई आणि उन्हाळी सुट्यांमुळे सध्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, घोडेगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
१४ मे रोजी ‘महाकोंडी’चे सावट
येत्या १७ मेपासून अधिक मास सुरू होत असल्याने आता लग्नाचे केवळ शेवटचे काही मुहूर्त शिल्लक राहिले आहेत. त्यातही १४ मे हा या हंगामातील शेवटचा मोठा मुहूर्त मानला जात असल्याने त्या दिवशी तालुक्यात अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या काळात मे महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होऊ शकते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तातडीने विशेष वाहतूक नियोजन करून प्रमुख चौकांमध्ये कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








