
नेवासा – आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यासाठी विविध शासकीय सुविधा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाचा वारकऱ्यांचा पंढरपूरकडे जाणारा पायी प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पालखी मार्गावरील सुविधा, सुरक्षा, स्वच्छता तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते.

यासंदर्भात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही निधी व सुविधांबाबत मागणीपत्र देण्यात आले होते. तसेच शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर व संगमनेर तालुक्यातील आजी-माजी आमदारांसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
दरम्यान, गुरुवारी (दि. १४) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, महंत देवीदास महाराज म्हस्के, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, गणेश महाराज अरगडे, माऊली शिंदे व संपर्क प्रमुख आशिष कावरे यांच्याकडे अधिकृत मंजुरीपत्र सुपूर्द केले.

मंजूर करण्यात आलेल्या सुविधांमध्ये पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि फिरती शौचालयांसाठी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच पालखी तळ व विसाव्याच्या ठिकाणी १०० फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आरोग्य सुविधांसाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ठिकठिकाणी वैद्यकीय तपासणी केंद्रे, रुग्णवाहिका आणि आरोग्य शिबिरांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय रस्ते दुरुस्ती, विद्युत व्यवस्था, मुक्कामाच्या ठिकाणी प्रकाशयोजना तसेच वाहतूक नियोजन आणि पोलिस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व सुविधांमुळे ज्ञानेश्वरी पालखी सोहळा अधिक सुव्यवस्थित होणार असून, वारकरी बांधवांचा पंढरपूरकडे जाणारा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







