नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्या कार्यपद्धतीबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षांसह गटनेते व नगरसेवकांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. भविष्यात स्वतःविरुद्ध खोटे, बनावट अथवा सूडबुद्धीने प्रेरित गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त करत, कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास निष्पक्ष व सखोल चौकशी करूनच पुढील कायदेशीर निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता, अधिकारांचा गैरवापर, शासन निर्णयांचे उल्लंघन तसेच बेकायदेशीर कारभाराबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, प्रधान सचिव (नगरविकास विभाग), मुख्य सचिव तसेच इतर सक्षम प्राधिकरणांकडे लेखी तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत.

या तक्रारींची दखल घेत संबंधित सक्षम प्राधिकरणांनी चौकशी सुरू केली असून, त्यासंदर्भातील अधिकृत पत्रांच्या प्रतीही निवेदनासोबत जोडण्यात आल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सुरू असलेल्या चौकशीमुळे तक्रारदार लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याच्या उद्देशाने मुख्याधिकारी अथवा त्यांच्या सांगण्यावरून खोटे व सूडबुद्धीने प्रेरित गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होण्याची त्यांना भीती वाटत आहे. यापूर्वीही त्यांच्या गटातील काही लोकप्रतिनिधींविरुद्ध तसेच उपनगराध्यक्ष सौ. शालिनी संजय सुखदान आणि त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास घाईघाईने गुन्हा दाखल न करता सर्व पुरावे, कागदपत्रे, साक्षी आणि संबंधितांची बाजू ऐकून निष्पक्ष चौकशी करावी, खोटी अथवा दिशाभूल करणारी तक्रार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच या निवेदनाची दप्तरी नोंद घेऊन भविष्यातील कोणत्याही प्रकरणात त्याचा विचार करावा, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
हे निवेदन उपनगराध्यक्ष सौ. शालिनी संजय सुखदान, गटनेते जितेंद्र भाऊसाहेब कुर्हे तसेच नगरपंचायतीतील अन्य नगरसेवकांनी संयुक्तपणे सादर केले आहे.

दरम्यान, या निवेदनामध्ये करण्यात आलेले आरोप हे निवेदनकर्त्यांचे असून, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या आरोपांबाबत मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







