शिक्षक हा केवळ वर्गामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा व्यक्ती नसतो, तर तो समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा मार्गदर्शक असतो.हिंदी व मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याबरोबरच अध्यापन कार्य, सामाजिक बांधिलकी, सहकार्याची भावना आणि शिक्षकहितासाठी सातत्याने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. कल्याण वाघ यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या
गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या गेनबा सोपानराव मोझे प्रशालेत सलग 23 वर्ष व सद्यस्थितीत श्री. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या परिसरामध्ये श्री.सयाजीनाथ महाराज विद्यालय, आळंदी रोड, वडमुखवाडी, पुणे येथे गेल्या चार वर्षापासून हिंदी विषयाचे अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला महत्त्व दिले. वर्गातील अध्यापन हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक जाणीव, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज समाजातील विविध क्षेत्रांत आपापल्या कर्तृत्वाने योगदान देत आहेत, ही त्यांच्या शिक्षक म्हणून केलेल्या कार्याची खरी पावती आहे.

शिक्षकांच्या प्रश्नांशी आणि त्यांच्या अडचणींशी आपलेपणाने जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व म्हणूनही डॉ. कल्याण वाघ यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. पुणे शहरात 130 कोटींचा टर्नओव्हर असलेल्या पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून कारकीर्द सुरू करून आज पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदी कार्य करत असताना त्यांनी पतपेढीच्या माध्यमातून शिक्षकांच्या आर्थिक व सामाजिक गरजा समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.

शिक्षकांना अल्प दरामध्ये आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून देणे, गरजेच्या वेळी तातडीचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच शिक्षकांच्या हितासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, ही त्यांच्या कार्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. शिक्षकांच्या दैनंदिन आर्थिक गरजांपासून ते त्यांच्या सामाजिक व वैयक्तिक जीवनाशी संबंधित प्रश्नांपर्यंत त्यांनी संवेदनशीलतेने विचार केला.
शिक्षकांच्या मानसिक विरंगुळ्यासाठी आणि परस्परांमधील स्नेहभाव वाढविण्यासाठी आपल्या प्रशालेतील सहकारी शिक्षकांच्या मदतीने दक्षिण भारत व उत्तर भारताच्या सहली व विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला. अशा उपक्रमांमुळे शिक्षकांमध्ये केवळ सहकार्याची भावना निर्माण झाली नाही, तर परस्परांतील जनसंपर्क आणि आपुलकीचे नातेही अधिक दृढ झाले.

शिक्षकांच्या 1982 ची जुनी पेन्शन योजना, अनुदान, वेतनविषयक प्रश्न, मेडिकल बिले, वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच शासकीय स्तरावर प्रलंबित असलेली विविध कामे यांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी शिक्षकांच्या समस्या योग्य त्या शासकीय पातळीवर मांडण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या प्रश्नांना केवळ ऐकून न घेता त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची त्यांची कार्यपद्धती ही त्यांच्या नेतृत्वगुणांची ओळख आहे.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान शाळेत नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नाशी सतत प्रशासनाबरोबर प्रसंगी आंदोलनाच्या मार्गाने लढणाऱ्या व त्यांचे संघटन कौशल्य पाहून डॉ. कल्याण वाघ यांना महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध प्रश्नावर लढणाऱ्या…

महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद देऊन संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. तीही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता ठेवून संपूर्ण पुणे जिल्ह्याचे संघटन मोठ्या ताकदीनिशी त्यांनी उभे केले आहे. आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मुळशी, मावळ, हवेली,वेल्हा, पुरंदर, दौंड, भोर, बारामती,इंदापूर, पुणे शहर, व पिंपरी चिंचवड सारख्या तालुक्यात व ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांसाठी’ या भावनेतून काम करण्याची वृत्ती. शिक्षकांच्या अडचणींमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहणे, आवश्यक ते मार्गदर्शन करणे आणि उपलब्ध संस्थात्मक माध्यमांचा उपयोग करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, यामुळे ते शिक्षकांमध्ये विश्वासाचे आणि आपलेपणाचे स्थान निर्माण करू शकले आहेत.
एकीकडे वर्गामध्ये विद्यार्थी घडविणारा समर्पित शिक्षक, तर दुसरीकडे शिक्षक बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यासाठी प्रयत्न करणारा शिक्षकहितैषी सहकारी, आणि समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा मार्गदर्शक, अशा विविध भूमिका डॉ. कल्याण वाघ यांनी समर्थपणे निभावल्या आहेत.

त्यांच्या कार्याकडे पाहताना असे जाणवते की, खऱ्या अर्थाने शिक्षकाचे कर्तृत्व हे केवळ त्याने किती विद्यार्थ्यांना शिकविले यावर मोजले जात नाही; तर त्याने किती माणसे घडविली, किती सहकाऱ्यांना आधार दिला आणि समाजासाठी किती सकारात्मक योगदान दिले यावर त्याचे मोठेपण ठरते. या अर्थाने डॉ. कल्याण वाघ यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
शिक्षण, विद्यार्थी घडविणे, शिक्षकहित, सहकारभावना आणि सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याला मी त्यांचा एक निकटचा सहकारी मित्र श्री. पुरुषोत्तम घोडके सर मनःपूर्वक सलाम करतो.
डॉ. कल्याण वाघ यांच्या कर्तृत्वाला मनःपूर्वक अभिवादन आणि त्यांच्या पुढील सामाजिक, शैक्षणिक व शिक्षकहिताच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
शब्दांकन – श्री.पुरुषोत्तम घोडके(सर)
M.A. Bed.
, NET, SET (इतिहास), PhD Apperance पुणे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







