नेवासा : अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता चौथीपर्यंत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेवासा खुर्द मुले येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘आजचा पाहुणा’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत सेवा करणाऱ्या मान्यवरांना शाळेत आमंत्रित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती दिली जाते. यावेळी विद्यार्थीच ‘बाल पत्रकार’ बनून मान्यवरांची मुलाखत घेतात.

शाळेतील परिपाठादरम्यान विद्यार्थ्यांना ‘मी कोण होणार?’ हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी संरक्षण क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयी सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक श्री. आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती सुनिता कर्जुले यांच्या संकल्पनेतून हेड कॉन्स्टेबल श्री. समीर शेख यांना ‘आजचा पाहुणा’ म्हणून आमंत्रित करण्यात आले.
यावेळी बाल पत्रकार सात्विक राऊत, सफवान पटेल, आरुष लोखंडे, देवांश एरंडे, अवनीश सुकाळकर आणि जीवनराज चांदणे यांनी पोलीस दलाची कार्यपद्धती, पोलिसांचे कर्तव्य, पोलीस होण्यासाठी आवश्यक शिक्षण व प्रशिक्षण, पोलिसांसमोरील आव्हाने तसेच समाजातील पोलिसांची भूमिका याबाबत विविध प्रश्न विचारून सविस्तर माहिती जाणून घेतली.

या मुलाखतीमुळे विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयी प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळाली. तसेच प्रश्न विचारणे, संवाद साधणे, आत्मविश्वासाने बोलणे आणि माहितीचे संकलन करणे यांसारख्या कौशल्यांचा विकास होण्यास मदत झाली.
कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका कामिनी बायास, संध्या लोंढे, मीनाक्षी लोळगे, विद्या खामकर, ज्योती गाडेकर, अश्विनी मोरे, प्रतिभा गाडेकर, अर्चना बोकारे आदी उपस्थित होत्या. परिपाठाच्या वेळी शिक्षक श्री. अण्णासाहेब शिंदे यांनी मुलाखतीचे सूत्रसंचालन व नियोजन केले. तर श्रीमती कामिनी बायास यांनी उपक्रमाचे महत्त्व विशद करून मान्यवरांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







