नेवासा – नेवासा तालुक्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने शेतकऱ्याचे पीक वाया गेले आहे आणि गंभीर पाणी संकट उभे राहिले आहे त्यामुळे नेवासा तालुका दुष्काळी जाहीर करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांना निवेदन पाठवून ऍड. सादिक शिलेदार यांनी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा हा मुख्यत्वे जिरायती व मान्सूनच्या पावसावर आधारित शेती करणारा तालुका आहे. सन २०२६ च्या खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे नेवासा तालुक्यातील कृषी व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सर्वसामान्य बळीराजा आणि नागरिक अभूतपूर्व संकटात सापडले आहेत.

तालुक्यातील सद्यस्थिती आणि शासकीय निकषांनुसार वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे:
१. पावसाची तीव्र तूट आणि पावसाचा प्रदीर्घ खंड पडला आहे.जुलै २०२६ मध्ये झालेल्या सुरुवातीच्या पावसानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने तब्बल ३० ते ४० दिवसांची प्रदीर्घ दडी मारली. ऑगस्ट महिन्यात ९५.४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ २७ मिमी पावसाची नोंद झाली असून, तब्बल ७४% पावसाची तूट निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘मॅन्युअल फॉर ड्रॉट मॅनेजमेंट २०१६’ च्या नियमानुसार सलग २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड हा पिकांसाठी अत्यंत घातक मानला जातो.
२. पावसाच्या अभावामुळे आणि तीव्र उन्हामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला आहे. उडीद व मूग ही अल्पमुदतीची खरीप पिके पूर्णपणे करपून गेली असून शेतकऱ्यांना त्यावर नांगर फिरवावा लागला आहे.

सोयाबीन, कापूस आणि बाजरी या मुख्य पिकांचे उत्पादन ५०% ते ८०% पेक्षा जास्त घटण्याची भीती निर्माण झाली आहे. कागदपत्रांवर १००% पेरणी दिसत असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे भांडवल पूर्णपणे वाया गेले आहे.
३. पावसा अभावी भूजल पातळी अत्यंत वेगाने खालावली असून विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. नेवासा तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
४. शासकीय निकषांची पूर्तता: केंद्र शासनाच्या ‘दुष्काळ व्यवस्थापन नियमावली २०१६’ मधील ‘ट्रिगर-१’ (पावसाची तूट व पावसाचा प्रदीर्घ खंड) आणि ‘ट्रिगर-२’ (वनस्पती निर्देशांक, पीक नुकसान, जमिनीतील आर्द्रता व जलस्रोत टंचाई) या दोन्ही तांत्रिक अटींची नेवासा तालुक्यात पूर्ण पूर्तता होत आहे.

आमच्या प्रमुख मागण्या:
१. नेवासा तालुक्यात कोणत्याही तांत्रिक विलंबाविना तातडीने ‘गंभीर दुष्काळ’ घोषित करण्यात यावा.
२. थेट नुकसानभरपाई: बाधित शेतकऱ्यांना पीक विम्यासह प्रति हेक्टरी तातडीची आर्थिक मदत वितरित करण्यात यावी.
३. महसूल व कर्ज सवलती: तालुक्यातील शेतकऱ्यांचा जमीन महसूल (शेतसारा) माफ करावा, कृषी कर्जाच्या वसुलीस तत्काळ स्थगिती देऊन कर्जाचे मध्यममुदतीत रुपांतरण करण्यात यावे.
४. वीज बिल माफी: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतीसाठीच्या वीज बिलात सवलत/माफी देण्यात यावी.
५. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मंजुरी प्रक्रिया स्थानिक पातळीवर सोपी करून तातडीने टंचाई ग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यात यावा .

६. चारा डेपो व छावण्या: पशुधनाचा जीव वाचवण्यासाठी व चाऱ्याचा तुटवडा रोखण्यासाठी पंचायत समिती स्तरावर शासकीय चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात.
७. शैक्षणिक शुल्क माफी: दुष्काळग्रस्त भागातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा व शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे.
८. मनरेगा अंतर्गत कामे सुरु करा
नेवासा तालुक्यातील बळीराजा आज अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. तरी शासनाने वस्तुस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे…


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







