October 2026 Rules : सप्टेंबर महिन्याचा आज शेवटचा दिवस असून, उद्यापासून ऑक्टोबर २०२६ला सुरुवात होत आहे. नव्या महिन्याच्या सुरुवातीसोबतच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. यामध्ये LPG गॅसचे दर, ATMमधून पैसे काढण्याचे शुल्क, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती आणि फिक्स्ड डिपॉझिटशी संबंधित नियमांचा समावेश आहे.

LPG गॅसच्या दरात बदलाची शक्यता
तेल आणि गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPGच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जाहीर करतात. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून घरगुती तसेच व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच LPGशी संबंधित काही कागदपत्रांची कामे किंवा सबसिडीशी संबंधित प्रक्रिया प्रलंबित असल्यास ती वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ATMमधून पैसे काढणे महागणार?
SBIच्या ATM व्यवहारांशी संबंधित शुल्कांमध्येही बदल होण्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. काही व्यवहारांसाठी १५ रुपये अधिक GST, तर काही सॅलरी अकाउंट ग्राहकांसाठी मोफत व्यवहारांची मर्यादा कमी होऊन अतिरिक्त व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ATMमधून वारंवार पैसे काढणाऱ्या ग्राहकांना याचा आर्थिक परिणाम होऊ शकतो.

TV, फ्रिज आणि ACच्या किमती वाढण्याची शक्यता
१ ऑक्टोबरपासून टीव्ही, फ्रिज आणि एसीसह काही इलेक्ट्रॉनिक वस्तू महागण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे उत्पादकांकडून या वस्तूंच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. काही अहवालांनुसार, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत सुमारे ८ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

FDच्या माहितीसंदर्भात बँकांना नवे निर्देश
फिक्स्ड डिपॉझिटशी संबंधित माहिती अपडेट करण्याबाबतही बँकांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. बँकांना त्यांच्या FDशी संबंधित तपशील नियमितपणे अपडेट करून निर्धारित वेळेत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याच्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे.
त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून लागू होणाऱ्या या बदलांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होऊ शकतो. त्यामुळे LPGचे नवीन दर, बँक शुल्क आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींबाबत अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







