नेवासा – स्वदेशी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, हमीभाव आणि संरक्षण नाकारून परदेशी उत्पादकांसाठी भारतीय बाजार खुले करण्याची केंद्र सरकारची भूमिका ही भारतीय शेतीचा कणा मोडणारी व शेतकऱ्यांना दारिद्र्याकडे ढकलणारी दुहेरी नीती असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भारतीय शेतमालाच्या निर्यातीवर १८ टक्क्यांपर्यंत शुल्क, गुंतागुंतीच्या प्रमाणपत्र अटी, प्रशासकीय अडथळे आणि वेळोवेळी लादली जाणारी निर्यात बंदी यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असताना, अमेरिका व इतर विकसित देशांतून अल्प अथवा शून्य शुल्कात शेतीमालाची आयात करून परदेशी शेतकऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मुक्त व्यापार करारांमुळे आयात वाढते, बाजारभाव कोसळतात आणि त्याचे सर्व परिणाम शेतकऱ्यांवर लादले जातात. उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नाहीत, एमएसपीला कायदेशीर हमी नाही, आणि तरीही शेतकऱ्यांवर निर्बंध वाढवले जात आहेत. ही परिस्थिती केवळ आर्थिक नसून शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाशी निगडित थेट आर्थिक-राजकीय लढाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले.आज सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे मुळात शेतकरीच असून, शेतीच्या प्रश्नावर पक्षीय झेंडे, चिन्हे आणि राजकीय ओळखी बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र येण्याची ही निर्णायक वेळ आहे, असे आवाहन करण्यात आले.

“राजकीय पक्षांचे खांदे वापरून जर शेतकरी आपलेच नुकसान करून घेत असतील, तर ही गुलामगिरी थांबवावी लागेल,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.शेतकऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने, तालुक्यातील सर्व विचारधारांचे शेतकरी, कार्यकर्ते आणि संघटनांनी एका चौकटीत संघटित होऊन रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. अन्यथा आजची पिढी आणि उद्याची पिढी दोन्ही शेतीपासून हद्दपार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले व पदाधिकाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सरकारमधील जबाबदार घटकांनी वेळीच निर्णय न घेतल्यास, हे आंदोलन राज्यव्यापी रूप धारण करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

