स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल
आपला जिल्हा : जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना जामखेड शहरातून ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ही कारवाई दिनांक ६ मे २०२६ रोजी जामखेड येथील आरोळेवस्ती परिसरात करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हद्दपार इसम सोनू कुंदन वाघमारे आणि विक्रम भगवान डाडर हे जामखेड शहरातील आरोळेवस्ती येथील एका शेतामध्ये विनापरवाना वास्तव्यास आहेत.माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.

यावेळी दोन्ही इसम आढळून आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली ओळख सोनू कुंदन वाघमारे (वय ३४) आणि विक्रम भगवान डाडर (वय ३७, दोघे रा. आरोळेवस्ती, जामखेड) अशी सांगितली.पोलिसांनी त्यांच्या हद्दपार आदेशाची खातरजमा केली असता, दोघांनाही दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ पासून एक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सुनिल रमेश मालणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.दरम्यान, जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले इसम विनापरवाना अहिल्यानगर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे आढळल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या ०२४१-२४१६१११ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








