नेवासा – तालुक्यातील मक्तापूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार अजित साळवे यांना छत्रपती संभाजीनगर येथील ‘साहित्यधार बहुउद्देशीय संस्था’ यांच्या वतीने ‘आदर्श चित्रकार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या गौरवपूर्ण यशाबद्दल त्यांच्या निवासस्थानी नुकताच एक शानदार स्नेहसोहळा व सन्मान समारोह आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सातुरे सर यांनी केले. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, अजित साळवे यांच्यासारखा समर्पित कलाकार आपल्या नेवासा तालुक्याला लाभला, हे आपले मोठे भाग्य आहे. त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचे व समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने घडत असून त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशा सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

याप्रसंगी मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी साळवे यांच्या प्रवासाचे कौतुक करताना कमळाच्या फुलाचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे चिखलात कमळ फुलते, त्याचप्रमाणे अजित साळवे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कला क्षेत्रात हे मोठे यश गाठले आहे आणि ते सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मक्तापूरचे माजी सरपंच पुनमचंद साळवे यांनी आपले मत व्यक्त करताना, अजित साळवे यांना मिळालेला हा सन्मान आपल्या संपूर्ण मक्तापूर गावासाठी खरोखर भूषणाची आणि अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले.

यानंतर मक्तापूरचे माजी उपसरपंच देवदाण साळवे यांनी चित्रकार साळवे यांच्या कलेचा गौरव करत, ग्रामीण भागातील एका कलाकाराने राज्यस्तरावर मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे असे सांगून पाठथाप दिली.तसेच मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की चित्रकार अजितकुमार साळवे यांनी त्यांच्या चित्रकलेच्या जोरावर मक्तापुर सारख्या खेडेगावाचे नाव महाराष्ट्र पातळीवर गाजवले आहे,प्रदीप साळवे यांनी साळवे यांच्यातील अंगभूत गुणांचे कौतुक केले आणि त्यांची कला अशीच पुढे बहरू दे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
साळवे यांचे बालमित्र रामचंद्र बर्डे यांनी त्यांच्या संघर्षाला उजाळा देताना सांगितले की, अजित यांनी आजपर्यंत अत्यंत मेहनत आणि जिद्दीने आपली कला जोपासली आहे. त्यांच्या याच अफाट कष्टाला या पुरस्काराच्या रूपाने खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे.

या सोहळ्याला उपस्थित सर्वांच्या वतीने अजित साळवे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी साई डेव्हलपर्सचे संचालक तथा मुकिंदपुर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब केदारे,भास्कर मामा लिहिणार,प्रा.आल्हाट सर,मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे,योहान साळवे, शैलेश साळवे, विजय साळवे, अविनाश साळवे यांसह अनेक स्नेही आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनीच चित्रकार साळवे यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे कौतुक करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे मक्तापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







