नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या क्रिमिनल केस क्रमांक १४२/२०२६ या खाजगी फौजदारी फिर्यादीची दखल घेत दिवाणी व फौजदारी न्यायालय, नेवासा यांनी महत्त्वपूर्ण आदेश पारित केला आहे. न्यायालयाने मुख्याधिकारी निखिल फराटे यांना दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून सविस्तर खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

फिर्यादी संजय लक्ष्मण सुखदान व सौ. शालिनी संजय सुखदान यांनी दाखल केलेल्या खाजगी फौजदारी फिर्यादीत भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३१८, ३३६, ३३८ आणि ३४० अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत. फिर्यादीनुसार, कथितरित्या खोटी कागदपत्रे तयार करून अपहार करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता मिळविणे तसेच शासन, लोकप्रतिनिधी आणि नेवासा शहरातील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीमध्ये नेवासा नगरपंचायतीच्या प्रशासनातील कथित अनियमितता, माहिती अधिकार कायद्यान्वये मागविलेली माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून न देणे, सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तामध्ये कथित फेरफार, प्रशासकीय नोंदींमधील कथित त्रुटी तसेच सार्वजनिक कर्तव्याच्या पालनासंदर्भातील विविध बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने या बाबींची दखल घेत मुख्याधिकारी निखिल फराटे यांना नोटीस बजावली असून, १० ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, फिर्यादींनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित तक्रारीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

या आदेशामुळे नेवासा नगरपंचायतीच्या प्रशासनाशी संबंधित प्रकरणाची न्यायालयीन पातळीवर सुनावणी सुरू झाली असून, क्रिमिनल केस क्रमांक १४२/२०२६ मधील पुढील सुनावणीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फिर्यादींचे म्हणणे आहे की, नगरपंचायतीच्या कामकाजासंदर्भात विविध सक्षम प्राधिकरणांकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रभावी कारवाई झाली नसल्याने अखेर न्यायालयात खाजगी फौजदारी फिर्याद दाखल करण्यात आली. न्यायालयाने त्या फिर्यादीची दखल घेत संबंधित मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविल्याने प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत दाखल झाले आहे.

या प्रकरणात फिर्यादींच्या वतीने अॅड. सादिक शिलेदार यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. रिदवान इनामदार, अॅड. प्रतीक जाधव आणि अॅड. राजेंद्र पंडित यांचे सहकार्य लाभले.
वरील वृत्त हे न्यायालयीन आदेशात नमूद करण्यात आलेल्या फिर्यादीतील आरोपांवर आधारित आहे. या आरोपांबाबत न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नसून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मुख्याधिकारी निखिल फराटे यांची बाजू किंवा स्पष्टीकरण न्यायालयीन प्रक्रियेनंतर समोर येणे अपेक्षित आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







