नेवासा : विठुरायाच्या ओढीने पंढरपूरची पायपीट करणाऱ्या एका वृद्ध वारकऱ्याचे जग अचानक वारीच्या जनसागरात हरवले. स्मरणशक्तीने साथ सोडल्यामुळे घराचा पत्ता आठवेना अन् वाट चुकून तब्बल महिनाभर त्या बापाला अन् त्याच्या कुटुंबाला विरहाच्या नरकयातना सहन कराव्या लागल्या. अखेर नेवासा तालुक्यातील सौंदाळा शिवारात या दुरावलेल्या आयुष्याला विसावा मिळाला आणि महिनाभराच्या काळ्याकुट्ट अंधारानंतर बाबा पुन्हा सुखरूप मुलाच्या कुशीत विसावले.

स्वतःच्या बापाला समोर जिवंत पाहताच मुलाचा कंठ दाटून आला आणि महिनाभर साचलेला दुःखाचा धबधबा अश्रूंच्या रूपाने वाहू लागला. बाप-लेकाची ही हृदयद्रावक गळाभेट सौंदाळ्याचे सरपंच शरदराव आरगडे यांच्या संवेदनशील आणि धडपड्या वृत्तीमुळे शक्य झाली.
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील भिडी गावचे तुकाराम मेश्राम हे आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेले होते. परंतु, गर्दीत तुटलेली ती साथ त्यांच्या आयुष्याची परवड करणारी ठरली. वयोमानामुळे स्मृती धूसर झाली होती, मनात भीती आणि अंगात थकवा होता. महिनाभर अन्ना पाण्याच्या शोधात भटकणारे तुकाराम बाबा भटकत भटकत नेवासा तालुक्यातील सौंदाळा शिवारात आले.

शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलांच्या नजरेस जेव्हा हे थकलेले आणि हताश बाबा पडले, तेव्हा त्यांच्यातील आई-भगिनीचे मन हेलावले. त्यांनी तात्काळ सौंदाळ्याचे संवेदनशील सरपंच शरदराव आरगडे यांना फोन केला. बाबा तोंडातून फुटके तुटके शब्द बोलत होते, माहिती अपुरी होती; पण सरपंच आरगडे यांना त्या वृद्धाच्या डोळ्यांतील एकाकीपणा आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. “कुणाचा तरी बाप असा रस्त्यावर तडफडू नये,” याच एका भावनेने त्यांनी बाबांना जवळ घेतले, पाणी पाजले आणि एक मायेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला.

हा व्हिडिओ जेव्हा वर्धा जिल्ह्यातील भिडी गावात पोहोचला, तेव्हा महिनाभरापासून बापाच्या शोधात डोळ्यांतील पाणी आटलेल्या त्या मुलाच्या काळजाचा ठोका चुकला. “माझे बाबा सापडले!” या एका वाक्याने त्या कुटुंबाच्या विश्वाला पुन्हा उजाळा दिला.काल सकाळी तुकाराम बाबांचा मुलगा जेव्हा सौंदाळा गावात पोहोचला, तेव्हा तेथील हवाही स्तब्ध झाली होती.
महिनाभराच्या ताटातुटीनंतर आपल्या पांढऱ्या केसांच्या, थकलेल्या बापाला समोर पाहताच मुलाने धावत जाऊन त्यांना घट्ट मिठी मारली. दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. “बाबा, कुठे गेला होतात?” हा एका लेकराचा टाहो आणि बापाने लेकाच्या पाठीवरून थरथरणार्या हाताने फिरवलेली फुंकर… या दृश्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकले.

आपल्या लेकराच्या हाती सुरक्षित बापाला सोपवताना सरपंच शरद आरगडे व सौंदाळा ग्रामस्थांचे डोळेही आनंदाश्रूंनी भरून आले होते. तुकाराम बाबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत अत्यंत जड अंतःकरणाने सरपंच शरद अरगडे यांनी निरोप दिला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







