नेवासा : विधानसभा निवडणुकीवेळी मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाने पाठविलेल्या मार्गदर्शिका मतदारांपर्यंत पोहोचविण्याऐवजी तहसील कार्यालयातच धूळ खात पडून राहिल्याचा आरोप आहे. वाटप न झालेल्या या मार्गदर्शिकांचे पुढे काय झाले? त्या रद्दीत विकल्या का, की नियमबाह्य पद्धतीने विल्हेवाट लावली? याचे स्पष्ट उत्तर तहसील प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

मतदारांना मतदान प्रक्रिया, मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा, घरून मतदान आणि टपाल मतपत्रिकेबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून या मार्गदर्शिका पाठविण्यात आल्या होत्या. मात्र त्या मतदारांपर्यंत पोहोचल्या नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे मतदार जागृतीसाठी आलेले साहित्य मतदारांपर्यंत पोहोचलेच नसेल, तर त्याचा उपयोग नेमका कशासाठी झाला? असा सवाल उपस्थित झाला आहे.
आता प्रशासनाने आयोगाकडून किती मार्गदर्शिका प्राप्त झाल्या, किती वितरित केल्या आणि किती शिल्लक राहिल्या, याचा हिशोब स्पष्ट करावा. शिल्लक मार्गदर्शिकांची विल्हेवाट लावली असल्यास ती कोणाच्या आदेशाने, कोणत्या प्रक्रियेनुसार आणि त्याची नोंद कुठे आहे, याचाही खुलासा करण्याची मागणी आहे.

मार्गदर्शिका रद्दीत विकल्या असल्यास त्यासाठी अधिकृत प्रक्रिया राबविण्यात आली का, विक्रीतून मिळालेली रक्कम शासनाच्या खात्यात जमा झाली का आणि त्याची नोंद उपलब्ध आहे का, याचीही चौकशी करावी. विल्हेवाट किंवा विक्री नियमबाह्य असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून लागू असलेल्या शासकीय नियमांनुसार प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी तक्रारदार स्वप्निल गरड यांनी ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून मार्गदर्शिकांच्या प्राप्तीपासून वितरण व अंतिम विल्हेवाटीपर्यंतचा हिशोब तपासावा आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

“मतदार जागृतीसाठी आलेल्या मार्गदर्शिका बीएलओ तसेच समाजसेवी व्यक्तींच्या माध्यमातून वितरित करण्यात आल्या. प्रत्येक मतदारापर्यंत त्या पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.”
– संजय बिरादार, तहसीलदार नेवासा.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







