माळेवाडी येथे तिसऱ्या गळीत हंगामासाठी बॉयलर पूजन; यंदा साडेचार ते पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
नेवासा तालुका : नेवासा तालुक्यातील माळेवाडी येथे कार्यरत असलेल्या स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीजच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर बॉयलर पूजनाचा धार्मिक विधी कारखान्याच्या संचालिका डॉ. ममता शिवतारे-लांडे व शिवदीप लांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पोटफोडे शिवाजी रामचंद्र व सौ. अलका शिवाजी पोटफोडे यांच्या शुभहस्ते मंत्रोच्चार व विधिवत होमहवन करून पूजन संपन्न झाले.
यावेळी बोलताना डॉ. ममता शिवतारे-लांडे यांनी “स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीज हा केवळ आमचा कारखाना नसून शेतकऱ्यांची कामधेनू आहे.

त्यामुळे प्रत्येकाने हा आपला कारखाना समजून सहकार्य करावे. शेतकऱ्यांना योग्य भाव आणि योग्य न्याय देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील,” अशी ग्वाही दिली. यंदाच्या गळीत हंगामासाठी जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस स्वामी समर्थ कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखान्याच्या प्रगतीसोबतच त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगत डॉ. ममता शिवतारे-लांडे यांनी यंदा सुमारे साडेचार ते पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. कारखान्याची वाटचाल ज्या पद्धतीने उत्कृष्ट होईल, त्याच पटीने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, “सर्व कामगारांनी हा आपला घरचा कारखाना समजून तन-मन-धनाने काम करावे. कारखाना आणि शेतकरी या दोघांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत.” कामाच्या ठिकाणी कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कारखान्याच्या विविध विभागांतील विभागप्रमुख व कामगारांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, कारखान्याचे चेअरमन विजय शिवतारे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यंदाच्या हंगामात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून काम करून पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना उत्तम सेवा देण्याबरोबरच साखर व मोलॅसिसची गुणवत्ता कायम राखण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद यांच्या बळावर कारखान्याची प्रगती साधायची असून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका कुटुंबाप्रमाणे काम करावे, असे आवाहनही विजय शिवतारे यांनी केले. आगामी मुळी टाकण्याच्या कार्यक्रमास स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात अशोकराव लंघे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. बॉयलर पूजनावेळी डॉ. ममता शिवतारे-लांडे, शिवदीप लांडे, व्हाइस मॅनेजर सुनील पवार, चीफ केमिस्ट राजेसाहेब, इलेक्ट्रिकल इंजिनिअर जाधव, को-जन मॅनेजर कदम, परचेस ऑफिसर पवार, शेतकी अधिकारी इथापे, सिव्हिल इंजिनिअर गोडसे, शेतकी अधिकारी नानासाहेब लंघे, अशोकराव लंघे, विशाल म्हस्के, शेतकी हेड क्लार्क गणेश मुरकुटे, हेड क्लार्क संदीप शिंदे, वरखेडचे उपसरपंच विलासराव उंद्रे, सरपंच विनोद ढोकणे, रामडोहचे बापूसाहेब गुंजाळ, भालेराव देवा गुरु आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाला नेवासा तालुक्यातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. तिसऱ्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या गाळप उद्दिष्टामुळे तसेच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे यंदाच्या हंगामाकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







