नेवासा – संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या पाशवी ॲसिड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत असून, या घटनेविरोधात नेवासा येथील सराफ सुवर्णकार संघटना आक्रमक झाली आहे. या अमानवीय कृत्याचा निषेध नोंदवत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि नराधम आरोपीला अद्दल घडवण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाला साकडे घालण्यात आले.

याबाबतचे सविस्तर निवेदन नेवासा तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण माणुसकीवर झालेला आघात आहे, अशा संतप्त भावना संघटनेने व्यक्त केल्या. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित आरोपीवर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवून तातडीने दोषारोपपत्र सादर करण्यावर संघटनेने भर दिला आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून गुन्हेगाराला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि पीडितेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी निष्णात विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी, असेही संघटनेने सुचवले आहे. याव्यतिरिक्त ‘मनोधैर्य’ योजनेतून पीडित बालिकेला तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी आणि पीडित कुटुंब व साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, असा आग्रह धरण्यात आला आहे. परिसरात अनधिकृतपणे होणारी ॲसिड विक्री रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

जर या प्रकरणात प्रशासनाकडून दिरंगाई झाली किंवा पीडितेला न्याय मिळण्यास अडथळे आले, तर लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सराफ सुवर्णकार संघटनेने दिला आहे. या निवेदनावर वरद पोतदार, प्रमोद पोतदार, प्रशांत पोतदार, विकास डहाळे, मनोज डहाळे, प्रकाश डहाळे, दीपक डहाळे, संजय अंबीलवादे, किरण अंबीलवादे, राजेश अंबीलवादे, धनंजय डहाळे, श्रीकांत डहाळे, निरंजन डहाळे, अतुल सोनार, स्वप्नील पोतदार, किरण डहाळे यांच्यासह संघटनेच्या अन्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







