नेवासा – नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयातील बोगस दस्त नोंदणीचे गंभीर प्रकार पुराव्यासह उघड होऊनही जिल्हा निबंधक कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांसह पुराव्यांची थप्पी देऊनही प्रशासनाने धारण केलेले ‘मौन’ आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या निष्क्रियतेमुळे भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठीशी घातले जात आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायदेशीर निकषांचे पालन करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची मूलभूत जबाबदारी आहे. गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने चौकशी, संशयास्पद दस्तऐवज जप्त करणे आणि मुळ नोंदींची पडताळणी होणे अपेक्षित होते. मात्र, नेवासा येथील या प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाची ही संशयास्पद भूमिका केवळ निष्क्रियता नसून, त्यामागे मोठे ‘साटेलोटे’ असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, पक्षकार प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही काही व्यवहार पार पडले आहेत. तर काही ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तांची नोंदणी झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. एवढेच नव्हे, तर न्यायालयीन वाद प्रलंबित असतानाही कायदे धाब्यावर बसवून दस्त नोंदवले गेल्याचे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. तरीही संबंधित रेकॉर्ड ताब्यात घेण्यास टाळाटाळ होत असल्याने संशय अधिकच बळावला आहे.

प्रशासकीय दिरंगाईमुळे आता महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याचा किंवा त्यात फेरफार होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच जर पुरावे गहाळ झाले, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वेळेत कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर या संपूर्ण यंत्रणेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायमची धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हा निबंधक उत्तर देतील का?
ठोस पुरावे समोर असूनही अद्याप चौकशीचे आदेश का दिले गेले नाहीत?
संशयास्पद कागदपत्रे आणि रेकॉर्ड तातडीने जप्त का करण्यात आले नाही?न्यायालयीन वाद सुरू असतानाही नियमबाह्य नोंदणी कशी झाली?कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याचा फायदा कुणाला मिळतोय?
उद्या महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले, तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का?

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







