डीवाय-३ चारीला पाणी सोडण्याची मागणी; नदीकाठचे बंधारे भरून देण्याची शेतकऱ्यांची मागणी
सोनई – नेवासा तालुक्यातील मुळा नदीकाठच्या पानेगाव, खेडलेपरमानंद, निभांरी, शिरेगाव आदी परिसरातील शेतकऱ्यांना सध्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून मुळा धरणाच्या आवर्तनाचे योग्य नियोजन होत नसल्याने शेतातील पिके पाण्याअभावी जळून चालली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

मुळा धरणात पाणी उपलब्ध असतानाही नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. विशेषतः डीवाय-३ चारीसाठी शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका पदाधिकारी विठ्ठल जाधव यांनी केला आहे.
मुळा नदीकाठावरील बंधारे पाण्याने भरून देण्यात यावेत, जेणेकरून परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होऊन पिकांना आधार मिळेल, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी संबंधित विभागाकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा मागणी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘पिके डोळ्यादेखत करपण्याची वेळ’
पानेगाव, खेडलेपरमानंद, निभांरी आणि शिरेगाव परिसरातील शेतकरी सध्या खरीप पिकांसाठी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाची अनिश्चितता आणि सिंचनाच्या पाण्याचे अपुरे नियोजन यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांना वेळेत पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुळा धरणाच्या पाण्याचे आवर्तन सोडताना लाभक्षेत्रातील शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांचाही विचार करून नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. केवळ कालव्यात पाणी सोडणे पुरेसे नसून प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणी पोहोचते की नाही, याची पाहणी करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे : विठ्ठल जाधव
मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर सध्याचे लोकप्रतिनिधी ठोस भूमिका मांडण्यास तयार नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका पदाधिकारी विठ्ठल जाधव यांनी केला. डीवाय-३ चारीला तातडीने पाणी सोडावे, नदीकाठावरील बंधारे भरून द्यावेत आणि मुळा धरणाच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शिरेगाव येथील शेतकरी संघटनेचे शिवाजी जाधव, शिरेगावचे उपसरपंच भगीरथ जाधव, कुशीरामजी जाधव, धनराज तुवर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
दरम्यान, मुळा धरणातून यंदाच्या खरीप हंगामासाठी सध्याच्या परिस्थितीत कोणत्या चाऱ्या व लाभक्षेत्राला किती पाणी देण्यात आले, तसेच डीवाय-३ चारीसाठी पाण्याचे नियोजन काय आहे, याबाबत मुळा पाटबंधारे विभागाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पाणी वेळेत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांना संघटित करून आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. पिके हातातून जाण्यापूर्वी डीवाय-३ चारीला पाणी सोडून नदीकाठावरील बंधारे भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







