गोधेगाव – नेवासा तालुक्यातील गोधेगाव गंगाठडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुरेश अहिरे या मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरेश अहिरे हे रात्री काशिनाथ औटे यांच्या घराबाहेर शेडमध्ये झोपलेले असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

रात्री ते दिसत नसल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी कपाशीच्या शेतात रक्ताचे डाग आणि प्राण्याच्या पायांचे ठसे आढळून आले. या ठशांच्या आधारे ग्रामस्थ पुढे जात असताना उसाच्या शेतात त्यांचे पाय छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याची माहिती आहे. त्यानंतर काही अंतरावर धडही आढळून आले. मृतदेहाचे इतर अवशेष शोधण्याचे काम सुरू असल्याचे समजते.
या घटनेची माहिती वन विभागाला शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा मिळाली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, अंधारामुळे रात्रीच्या वेळी शोधकार्यात अडथळे आले.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी मृत व्यक्तीचे पाय आणि हात खाल्लेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती नेवासा येथील वनरक्षक दामोदर धुळे यांनी दिली.

गोधेगाव गंगाठडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात किंवा घराबाहेरील मोकळ्या जागेत एकटे जाणे टाळावे. लहान मुले आणि पाळीव जनावरांवर लक्ष ठेवावे तसेच बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला घेरण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभागाला कळवावे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







