नेवासा – शासकीय धान्य पुरवठा साखळीतील भ्रष्टाचार आता थेट सर्वसामान्यांच्या जिवावर उठला आहे. नेवासा शासकीय गोदामात सलग दुसऱ्या दिवशी ओला आणि दुर्गंधीयुक्त गहू उतरवण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यामागे गव्हाचे वजन वाढवून शासनाला चुना लावणारे मोठे रॅकेट कार्यरत असून, संशयाची सुई थेट शासकीय वाहतूकदार गाढे यांच्यावर स्थिरावली आहे.

या रॅकेटचा खळबळजनक पर्दाफाश खुद्द एका ट्रक चालकानेच नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. केडगाव आणि खडकी येथून धान्य भरल्यानंतर या गाड्या नियोजित मार्गावरून न जाता थेट विळद येथील एका खाजगी गोदामात नेल्या जातात. तिथे रात्रीच्या अंधारात गव्हावर पाण्याचा फवारा मारला जातो. पाणी शोषल्यामुळे गव्हाचे वजन वाढते. धक्कादायक बाब म्हणजे, वाढलेल्या वजनाइतका ‘चांगला गहू’ तिथल्या तिथे बाजूला काढून चोरला जातो आणि बदल्यात ओला झालेला सडका गहू पाठवला जातो. या प्रक्रियेमुळे गव्हाला भीषण दुर्गंधी सुटते आणि तो मानवी वापरासाठी अयोग्य ठरतो.

पावसाळा नसतानाही गहू भिजलेला असणे, हा निव्वळ वजन वाढवण्याच्या अघोरी प्रकाराचा परिणाम आहे. मार्च अखेरची ‘तूट’ भरून काढण्यासाठी आणि स्वतःची तिजोरी भरण्यासाठी वाहतूकदाराने हा जीवघेणा प्रकार सुरू केल्याचा आरोप होत आहे. ओल्या गव्हातील बुरशी यकृत आणि मूत्रपिंडासाठी अत्यंत घातक असतानाही, ही ‘विषारी’ रॅकेट बिनबोभाट सुरूच कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.

विखे पाटलांच्या मतदारसंघातही दुर्गंधीयुक्त गहू ?
महसूल मंत्री ना. विखे पाटील यांच्या राहाता मतदारसंघातही अशाच ओल्या गव्हाच्या गाड्या रिकाम्या झाल्याची चर्चा आहे. जर एकाच वाहतूकदाराच्या गाड्या संपूर्ण जिल्ह्यात असा माल पोहोचवत असतील, तर या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. मुजोर वाहतूकदार गाढे यांच्यावर केवळ नोटिसांचा खेळ न खेळता, त्यांचे कंत्राट रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची हिंमत जिल्हा पुरवठा विभाग दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







