नेवासा | अविनाश जाधव – नेवासा तालुका शेतकरी संघटनेने कांद्याला बाजार भाव मिळत नसल्या कारणाने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत शासकीय कांदा खरेदी त्वरित चालू करावी अशी मागणी मा . तहसीलदार डॉ .संजय बिरादार यांच्या कार्यालयात केलेली आहे .सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील कांदा काढण्याचे काम चालू आहे .शेती कामांच्या गरजेपोटी, शैक्षणिक कारणाकरता, लग्नाकरिता तसेच वैद्यकीय खर्चांकरीता अशा अनेक अडीअडचणीमुळे शेतकऱ्याला कांदा विकावा लागणे भाग पडते आहे .परंतु शासनाच्या धरसोडीच्या निर्यात धोरणामुळे परदेशातील बाजारपेठांची दारे बंद झालेली असल्याने कांद्याचे बाजार भाव प्रचंड कोसळलेले आहेत .अवघ्या एक रुपयापासून ते पाच ते सात रुपयापर्यंत कांदा खरेदी चालू होत आहे .

वाढलेले डिझेलचे दर ,मजुरीचे दर ,खतांचे दर आणि अन्य निविष्ठांचे वाढलेले दर यामुळे कांद्याचा एकरी खर्च 90 हजार रुपये पर्यंत शेतकऱ्याला येत आहेत .अशातच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीनंतर अवघा सहा ते सात टन एकरी कांदा शेतकऱ्याला विक्री योग्य राहिला आहे .म्हणजे वीस रुपये तरी भाव मिळाला तरी उत्पादन खर्च देखील फिटणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे .वास्तविक एनसीसीएफ आणि नाफेड या संस्था कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांचेही हित संभाळण्याकरता निर्माण झालेल्या आहेत .परंतु एप्रिल मे महिन्यात नाफेडची शासकीय खरेदी बंद असते .ज्यावेळी मागणी पुरवठा तत्त्वानुसार पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी नैसर्गिक परिस्थिती येते त्यावेळेस कांद्याचे बाजार भाव नैसर्गिकरीत्या वाढत असतात .

अशावेळी शासन आवश्यक वस्तू कायद्याचा बडगा दाखवून निर्यात बंदी करते आणि दुसऱ्या बाजूला नाफेड ची खरेदी चालू करून बफर स्टॉक निर्माण करतात आणि पुन्हा तोच बफर स्टॉक मार्केटमध्ये आणून ग्राहकाचे हित सांभाळले जाते .परंतु कांदा उत्पादकांचे हित जोपासण्याकरिता ज्यावेळी कांदा उत्पादकाला नाफेड ची गरज आहे अशावेळी नाफेडची खरेदी केंद्र बंद असतात आणि ज्यावेळी शेतकऱ्याकडून मालत व्यापाऱ्याच्या हातात जातो अशा वेळेस व्यापाऱ्यांचाच कांदा अवैधरित्या नाफेड करून खरेदी केला जातो असे निदर्शनास आलेले आहे .सध्या मात्र कांद्याचे दर गडगडलेले असताना नाफेडचे दार शेतकऱ्यांकरता बंद आहेत या अनुषंगाने येत्या पंधरा दिवसाच्या आत नेवासे तालुक्यात नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र चालू करून कांदा उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे .

सदर शासकीय कांदा खरेदी लवकर चालू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन नेवासा तालुक्यात छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांनी दिलेला आहे .
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर ,तालुका अध्यक्ष अशोक काळे ,उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे ,युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी ,कायदेशीर सल्लागार एडवोकेट बाळासाहेब कावळे ,एडवोकेट सागर सागडे ,एडवोकेट ज्ञानेश्वर शिरसाठ ,सचिव किरण लंघे , भास्कर तुवर , बंडोपंत चौगुले , प्रा . कार्लस साठे सर , कैलास पवार ,दादासाहेब नाबदे ,दत्तात्रय निकम ,नवनाथ नाबदे, अशोक नागोडे , सोमनाथ औटी , भाऊसाहेब त -हाळ आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







