चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांची शिताफी; आखेगाव रोडवरून अटक
शेवगाव – खून, दरोडा, मकोका तसेच पोस्को कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराईत गुन्हेगार सचिन साहेबराव काते (रा. सामनगाव, ता. शेवगाव; ह.मु. इंदिरानगर, शेवगाव) याला शेवगाव पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी शिताफीने ताब्यात घेतले. गेल्या चार महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी शेवगाव येथील रेणुकानगर परिसरात झालेल्या हल्ल्यात किसन वाघमोडे यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता. या प्रकरणी राहुल किसन वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सचिन काते हा मुख्य आरोपी असून घटनेनंतर तो फरार झाला होता.
पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. दरम्यान, सचिन काते हा आखेगाव रोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

सचिन काते याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड येथील सांगवी पोलीस ठाण्यात मकोका कायद्यांतर्गत तर शेवगाव पोलीस ठाण्यात खून, मारहाण, पोस्को व इतर गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







