आपला जिल्हा : ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे नियोजन अधिक सुकर, शिस्तबद्ध आणि वारकरीहिताचे व्हावे, या उद्देशाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांची पंढरपूर येथे भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान पालखी सोहळ्याचा इतिहास, आध्यात्मिक महत्त्व, मार्गावरील नियोजन तसेच हजारो वारकरी भाविकांसाठी आवश्यक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि मुक्कामस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे महत्त्व जाणून घेत वारकरी सेवेबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची अमूल्य सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा असून, शासन आणि प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा येथील विश्वस्त कैलास भाऊ जाधव, टेंभुर्णीचे सरपंच तुकाराम पाटील, पंढरपूर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते माऊली भाऊ हळणवर, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार ह.भ.प. गणेश महाराज आरगडे, सोहळा समितीचे ह.भ.प. हरी महाराज भोगे, मंदिराचे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे, प्रा. संकेत गवळी तसेच रवि जमधडे आदी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायात सेवा हीच सर्वोच्च साधना मानली जाते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा वारसा जपत प्रशासन आणि समाज यांच्या समन्वयातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी उचलले जाणारे प्रत्येक पाऊल हे माऊलींच्या चरणी अर्पण केलेले भक्तीपुष्प असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ही भेट केवळ औपचारिक न राहता, वारकरीहितासाठी प्रशासन आणि समाज यांच्यातील सशक्त समन्वयाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







