आपला जिल्हा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होईपर्यंत त्यांना कार्यभारापासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक तथा गटनेते जितेंद्र भाऊसाहेब कुऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नगरपालिका प्रशासन विभागाचे मुख्य सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी दिनांक १२ मे २०२६ रोजीच्या पत्राद्वारे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्या कार्यपद्धतीबाबत दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, सभेचे इतिवृत्त व खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र, ज्या अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमिततेचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत, त्याच अधिकाऱ्याकडून खुलासा मागविणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत चौकशीदरम्यान कागदपत्रांमध्ये फेरफार किंवा पुरावे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित खुलासा मुख्याधिकारी यांच्याकडून स्वीकारू नये, तो त्रयस्थ व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत सादर करून घ्यावा, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांना कार्यभारापासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच तक्रारदार म्हणून स्वतःचे म्हणणे, पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्याची संपूर्ण संधी देण्यात यावी, अशीही मागणी जितेंद्र कुऱ्हे यांनी निवेदनात केली आहे.

दरम्यान, या निवेदनामुळे नेवासा नगरपंचायतीतील प्रशासकीय कारभाराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, संबंधित प्रकरणात वरिष्ठ प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आम्ही १७ एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नेवासा नगरपंचायतकडे खुलासा मागविला होता; मात्र आजपर्यंत तो प्राप्त झालेला नाही. अशा परिस्थितीत पुन्हा श्री. फराटे यांच्याकडे कार्यभार दिल्यास, त्यांच्या विरोधातील तक्रारीचाच खुलासा त्यांच्याकडूनच मागविला जाईल, ज्यामुळे चौकशीच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तक्रारींची चौकशी पूर्ण होईपर्यंत श्री. फराटे यांना कार्यभारापासून दूर ठेवून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, ही आमची जिल्हाधिकारी महोदयांकडे नम्र मागणी आहे.
-जितेंद्र कुऱ्हे, नगरसेवक तथा गटनेते, क्रांतिकारी शेतकरी पक्ष

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







