
आपला जिल्हा – श्रीक्षेत्र नेवासा येथून ८ जुलै २०२६ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या ऐतिहासिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजता लोणी येथे राज्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांची सोहळ्याच्या प्रतिनिधी मंडळाने सदिच्छा भेट घेत त्यांना प्रस्थान सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण दिले.

या प्रतिनिधी मंडळात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के , सोहळा समितीचे नवनिर्वाचित सदस्य ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक , संस्थानचे अध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, संस्थेचे विश्वस्त कैलास भाऊ जाधव तसेच कृष्णा आण्णा पिसोटेहरि महाराज भोगे यांचा समावेश होता. प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना सोहळ्याची उद्दिष्टे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारप्रसाराचे महत्त्व आणि यावर्षीच्या आयोजनाची रूपरेषा याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र नेवासा येथे होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहण्याची सकारात्मक ग्वाही दिली. त्यांच्या या आश्वासनामुळे सोहळा समिती, संस्थान आणि वारकरी संप्रदायामध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा संदेश केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नसून तो समता, ज्ञान, भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अखंड दीपस्तंभ आहे. त्या संदेशाचा प्रसार करणारा हा पालखी सोहळा दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून शासन, प्रशासन आणि समाज यांच्या समन्वयातून तो एक आदर्श लोकसहभागाचा उपक्रम म्हणून विकसित होत आहे.

यंदाच्या पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा आणि पालकमंत्र्यांनी दर्शविलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे ८ जुलैचा प्रस्थान सोहळा ऐतिहासिक, दिमाखदार आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास सोहळा समितीने व्यक्त केला.

ज्ञानेश्वरीचा ज्ञानप्रकाश आणि वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा अधिकाधिक जनमानसापर्यंत पोहोचावी, हा या पालखी सोहळ्यामागील मूलभूत संकल्प आहे. पालकमंत्र्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा त्या संकल्पाला मिळालेला महत्त्वपूर्ण बळ मानले जात आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







