नेवासा- शहरातील सदाशिवनगर येथे नव्याने उच्च दाबाची वीजवाहिनी व वितरण रोहित्र (DP) उभारण्याचे काम तात्काळ थांबवून पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.याबाबत महावितरणचे शाखा अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या नागरी वसाहतीमध्ये (सदाशिवनगर नेवासे) पूर्वीपासून पूर्व-पश्चिमं दिशेने उच्च दाबाची वीजवाहिनी गेलेली आहे. आता त्याच वीजवाहिनीला जोडून दक्षिण-उत्तर दिशेनें आणखी एक उच्च दाबाची वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण वसाहतीमध्ये उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे जाळे निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर वीजवाहिन्या घरांच्या अगदी जवळून जात असल्यामुळे आम्हाला आमच्या घरांच्या खिडक्या व बाल्कनीचे दरवाजे अनेकदा बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे नैसर्गिक हवा व प्रकाश यावर परिणाम होत असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या जीवितास व मालमतेस मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, वसाहतीतील श्री म्हसोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नव्याने वितरण रोहित्र (DP) बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी वसाहतीतील रहिवाशांची कोणतीही पूर्वसंमती किंवा परवानगी घेण्यात आलेली नाही.

सदर मंदिरामध्ये दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मंदिराच्या परिसरात लहान मुले नियमितपणे खेळत असतात. अशा ठिकाणी वितरण रोहित्र (DP) उभारल्यास सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
विशेष बाब म्हणजे, यापूर्वीही आम्ही या विषयासंदर्भात दिनांक १६/०७/२०१६ रोजी महावितरण विभागास लेखी अर्ज सादर करून आमच्या हरकती व सूचना कळविल्या होत्या. त्या अर्जाची प्रत या निवेदनासोबत जोडत आहोत. मात्र, आमच्या निवेदनाची योग्य दखल न घेता सदर काम सुरु करण्यात आले आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की,
१. वसाहतीमध्ये सुरु असलेले नव्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे काम तात्काळ थांबविण्यात यावे.
२. श्री म्हसोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रस्तावित वितरण रोहित्र (DP) बसविण्याचे काम तात्काळ स्थगित करण्यात यावे.
३. सदर वितरण रोहित्र (DP) वसाहतीबाहेरील सुरक्षित, मोकळ्या व सार्वजनिक वर्दळ नसलेल्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे.
४. पुढील कोणतेही काम करण्यापूर्वी वसाहतीतील रहिवाशांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांची संमती व हरकती विचारात घेण्यात याव्यात.

नागरिकांच्या, जीविताचे संरक्षण करणे ही शासन व संबंधित विभागांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
अन्यथा, आम्हाला आमच्या घटनात्मक व कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) तसेच सक्षम न्यायालयाकडे दाद मागण्यास भाग पडेल, याची कृपया नोंद घ्यावी.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







