भेंडा(वार्ताहर):-– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील श्री संत नागेबाबा मंदिर परिसर विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांना २ कोटी ५२ लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी केला असून त्यात म्हंटले आहे की,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत “श्री क्षेत्र नागेबाबा गोसावीचे देऊळ, भेंडा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर” या “ब” वर्ग ग्रामीण यात्रास्थळाच्या ठिकाणी विविध विकास कामांकरीता निधी उपलब्ध करुन देणेबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. या प्रस्तावावर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य निकष समितीच्या दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत विचार करण्यात आला.

सदर बैठकीत उपरोक्त नमूद यात्रास्थळाच्या ठिकाणी करावयाच्या विकास कामांची अंदाजपत्रके व इतर कागदपत्रांची तपासणी करुन समितीने विकास कामांकरिता निधीची शिफारस केली आहे. त्यानुसार सदर यात्रास्थळाच्या ठिकाणी करावयाच्या विकास कामांना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत निधीतून “श्री क्षेत्र नागेबाबा गोसावीचे देऊळ, भेंडा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर” या “ब” वर्ग यात्रास्थळाच्या ठिकाणी एकूण रु. २ कोटी ५२लाख ५९ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

यामध्ये सभामंडप बांधकाम (२ कोटी रुपये),रेनवॉटर हार्वेस्टिंग (१ लाख रुपये),रुफ टॉप सोलर (१० लाख रुपये), हँडीकॅप रॅम्प (२ लाख रुपये),
विद्युतीकरण (१७ लाख १ हजार ८५६ रुपये),अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना (२० लाख रुपये), वाहनतळ विकास (२ लाख ५७ हजार ५०० रुपये) या कामांचा समावेश आहे.
सातत्याने पाठपुरावा करून श्रीसंत नागेबाबा विकासासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल नागेबाबा मंदिर व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ व भाविकांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी धन्यवाद दिले आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







