कुकाणाः नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील विविध विकासकामांच्या आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लोकानियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी २३ फेब्रुवारी २०२६ पासून पुकारलेले उपोषण ३ दिवसांनंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. प्रशासनाने बहुतांश मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

उपोषणादरम्यान २२० केव्ही सबस्टेशनमध्ये आउटसोर्सिंगद्वारे गावातीलच सुशिक्षित तरुणांना प्राधान्य देण्यास कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे सहमती दर्शवली आहे. गावातील शिवरस्ते आणि पाणंद रस्ते खुले करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत लवकरच मोजणीची तारीख दिली जाणार आहे. जल जीवन योजनेअंतर्गत रखडलेली कामे लवकरच सुरू करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. महावितरणच्या ३३ केव्ही सबस्टेशन अंतर्गत सर्व वाड्या-वस्त्यांवरील सिंगल फेज वीजपुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात आले असून हे काम लवकरच मार्गी लागेल.

ग्रामपंचायत कर वसुलीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे, तसेच गौण खनिज वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठी ‘रोहयो’तून निधीची तरतूद केली जाईल. नवीन शिधापत्रिका (रेशन कार्ड) ऑनलाईन करण्यासाठी आणि धान्य पुरवठ्यासाठी गावात तातडीने विशेष कॅम्प आयोजित केला जाणार आहे, अशी प्रशासनाच्यावतीने लेखी आश्वासने मिळाली.
प्रशासनाच्यावतीने लेखी आश्वासन घेऊन तहसीलदार संजय बिरादार यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन तिसऱ्या दिवशी उपोषण सोडण्यात आले. या निर्णयामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून प्रशासनाचे सहकार्य लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

