बालाजी देडगाव – येथील नामांकित तक्षशिला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालाजी दिंडी सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत केले. विद्यालयात आज भक्तीचा एक अनोखा रंग पाहायला मिळाला. हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या नेतृत्वाखाली श्री बालाजी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

या दिंडी सोहळ्याचे आगमन विद्यालयाच्या परिसरात होताच, संपूर्ण वातावरण विठ्ठल विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले. तक्षशिलाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून या दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. दिंडीचे स्वागत करण्यासाठी विद्यार्थी वारकऱ्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. टाळ, मृदंग आणि मुखात मधुर आवाजातील अभंग यामुळे परिसराला पंढरपूरचे स्वरूप आले होते.

विद्यालयाचे शिक्षक प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी मिळून दिंडीतील मुख्य पालखीचे व संतांचे पूजन केले. याप्रसंगी शिस्त आणि भक्तीचा सुरेख संगम पहावयास मिळाला. शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती असूनही संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडला.

“पुढील पिढीला आपल्या समृद्ध संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, याच उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. आज विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह आणि भक्तीभाव कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल कदम यांनी केले.

याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना आणि वारकऱ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तक्षशिला विद्यालयातील या भक्तीमय सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात कौतुकासह होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







