नेवासा : केंद्र शासनाने कांद्याचा किमान हमी खरेदी दर (MAPP) योजना केवळ नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवून राज्यातील इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक १ जून २०२६ रोजी नेवासा बाजार समिती समोर केंद्र शासनाच्या कांदा खरेदी परिपत्रकाची होळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर कांदा पिकावर अवलंबून आहेत. मात्र केंद्र शासनाने जाहीर केलेली किमान हमी खरेदी दर योजना केवळ नाशिक जिल्ह्यासाठी लागू केल्याने इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने केवळ एका जिल्ह्यालाच लाभ देणे म्हणजे उर्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने शासनाने सदरचे परिपत्रक तात्काळ मागे घेऊन राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कांद्याला हमीभाव, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव व खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आगामी काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सदर आंदोलन शांततेत, लोकशाही मार्गाने व कायद्याचे पालन करून करण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, अशी ग्वाही संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली आहे. आंदोलनासाठी प्रहार सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर प्रहार सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग नवले, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन साबळे, धरणग्रस्त तालुकाप्रमुख नागनाथ आगळे, युवक तालुका प्रमुख विकास कोतकर, शेतकरी संघटक राजेंद्र कळस्कर यांच्यासह विविध पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

सदर निवेदनाची प्रत मा. केंद्रीय कृषिमंत्री, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री तसेच मा. आमदार बच्चूभाऊ कडू यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
अशी माहिती प्रहार सामाजिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अॅड. पांडुरंग औताडे यांनी दिली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







