पिचडगाव : सुमारे ८०० वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास लाभलेल्या पिचडगाव येथील ऐतिहासिक मुक्ताई बारवचे पुनरुज्जीवन पूर्ण झाले असून, या ऐतिहासिक जलवारशाचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य, हेरिटेज, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री मा. ना. आशिषजी शेलार यांच्या शुभहस्ते या बारवचे लोकार्पण होणार आहे.

मुक्ताई बारव ही केवळ पाण्याचा स्रोत नसून पिचडगावच्या समृद्ध इतिहासाची, संतपरंपरेची आणि प्राचीन जलसंस्कृतीची साक्ष देणारा महत्त्वपूर्ण वारसा आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज आणि मुक्ताई या भावंडांच्या पवित्र स्पर्शाने ही बारव शापमुक्त झाल्याची श्रद्धा ग्रामस्थांमध्ये आहे. एकेकाळी या बारवमुळे संपूर्ण पिचडगावची तहान भागत होती. मात्र कालांतराने दुर्लक्ष झाल्याने हा ऐतिहासिक जलवारसा नामशेष होण्याच्या मार्गावर होता.
या वारशाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व ओळखून सेवावर्धिनी, पुणे यांच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्पा’अंतर्गत मुक्ताई बारवचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

त्यामुळे तब्बल आठ शतकांचा जलवारसा पुन्हा नव्या रूपात ग्रामस्थ आणि भावी पिढ्यांसमोर येणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी जलपूजन, तसेच संतश्रेष्ठ मुक्ताई यांच्या साकारलेल्या सुंदर प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात येणार आहे.
सेवावर्धिनी, पुणे तसेच ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ, पिचडगाव यांच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







