राहता शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर घरावर आणि बांधकामावर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई ठरली असून, यामुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी राहता येथील एका कार्यक्रमात माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. मतदारसंघात महिलांची छेड काढणाऱ्यांच्या घरावर थेट जेसीबी चालवण्याचा इशारा त्यांनी दिला होता. गुरुवारी झालेल्या या धडक कारवाईमुळे विखे पाटील यांनी आपला शब्द कृतीत आणल्याची जोरदार चर्चा आता रंगली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला आधीच अटक केली आहे. दरम्यान, एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने पीडित मुलीला दमदाटी केल्याच्या निषेधार्थ नातेवाईक आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. संबंधित महिला अधिकाऱ्याची बदली करावी आणि मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या इतरांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. याच आंदोलनादरम्यान नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी आरोपीचे बेकायदा घर पाडण्यासाठी नोटीस बजावल्याची माहिती दिली होती.

त्यानुसार, राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासकीय यंत्रणेने पोलीस प्रशासन व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या चोख बंदोबस्तात ही मोहीम राबवली. आरोपी गायकवाड याचे ५ ते ६ ठिकाणचे कच्चे व पक्के बेकायदेशीर अतिक्रमण बुलडोझरच्या साहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिला व मुलींच्या विरोधात गैरकृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी या कारवाईतून कडक बोध घ्यावा, असा इशारा नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी दिला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







