
नेवासा : सृजन कट्टा हा दिवसेंदिवस ज्ञान, वाचन आणि प्रेरणेचा आनंद देणारा व्यासपीठ ठरत असून, नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दोन प्रेरणादायी क्षणांनी उपस्थितांची मने जिंकली.

आज ऑस्ट्रियन लेखक आणि मानसोपचारतज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल यांच्या ‘मॅन्स सर्च फॉर मीनिंग’ या जागतिक कीर्तीच्या पुस्तकाचे विवेचन कु. सई चौधरी हिने अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत केले. जीवनाचा अर्थ, दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि ‘लोगोथेरपी’ या विषयांसारख्या क्लिष्ट संकल्पना सईने सहज आणि समजण्यासारख्या पद्धतीने मांडल्या.

नाझी छळछावण्यांमधील अमानुष अनुभवांवर आधारित असलेल्या या पुस्तकामधून फ्रँकल यांनी जीवनाचा अर्थ शोधण्याची प्रेरणा दिली आहे. “जगण्याचे ‘का’ सापडले की कोणत्याही ‘कसे’ ला सामोरे जाता येते,” हा विचार सईने प्रभावीपणे उपस्थितांसमोर मांडला.

नेवासासारख्या ग्रामीण भागात वाचनाची आवड जपणारी आणि वाचलेले इतरांना समजेल अशा भाषेत मांडण्याची कला असलेली तरुण पिढी पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सई चौधरी हिचे तसेच तिला प्रेरणा देणाऱ्या तिच्या पालकांचे विशेष कौतुक करण्यात आले.
याच कार्यक्रमात MHT-CET परीक्षेत 99.64 टक्के गुण मिळवणाऱ्या चि. जयदीप अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागात राहून आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेत इतके उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल जयदीपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जयदीपचा हा सन्मान ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठीही हा सत्कार ऊर्जा देणारा ठरेल.
सृजन कट्टा हा केवळ वाचनाचा नव्हे तर विचार, प्रेरणा आणि यशाचा उत्सव बनत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







