
नेवासा : नेवासा नगरपंचायतीची दि. ३ जुलै रोजी होणारी सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून उपनगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे हरकत अर्ज दाखल केला आहे.

नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, सभेच्या अजेंड्यामध्ये बहुसंख्य सदस्यांनी सुचविलेल्या विकासकामांचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच विविध विषयांसमोर कोणत्या निधीतून कामे प्रस्तावित आहेत, किती निधी उपलब्ध आहे, अंदाजित खर्च किती आहे याचा कोणताही तपशील देण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पंधरावा वित्त आयोग, जिल्हा वार्षिक योजना तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर निधीतून विकासकामे करण्याबाबत नगरसेवकांनी लेखी स्वरूपात सूचना दिल्या होत्या. मात्र त्या विषयांचा अजेंड्यात समावेश न झाल्याने बहुसंख्य सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

विशेषतः अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या वेळेत विनियोगासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्यास निधी अखर्चित राहण्याची शक्यता नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

हरकत अर्जामध्ये सभेचा अजेंडा पुनर्विचारासाठी मागे घेऊन बहुसंख्य नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांचा समावेश करून नवीन अजेंडा प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विषयासमोर संबंधित निधीचा तपशील, तरतूद आणि मान्यतेची स्थिती नमूद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, निधी अखर्चित राहिल्यास अथवा शासनाकडे परत गेल्यास त्यासाठी जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही संबंधित नगरसेवकांनी केली आहे.
याप्रकरणी नगर प्रशासनाची भूमिका काय राहते आणि आगामी सर्वसाधारण सभेत यावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







