“येथे फक्त कायद्याचेच गाणे वाजणार”
नेवासा:”कोणाच्याही फर्माईशी नुसार काम करण्यासाठी पोलीस स्टेशन म्हणजे काही तमाशाचा फड नाही! कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस कोणाच्या तालावर नाचणार नाहीत. येथे केवळ आणि केवळ कायद्याचेच गाणे वाजवले जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांनी आणि कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी—आम्ही त्यांना कायद्याच्या तालावरच योग्य ती अद्दल घडवू!” अशा अत्यंत कडक आणि तिखट शब्दांत नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हेगार आणि राजकीय हस्तक्षेपांचा प्रयत्न करणाऱ्यांना सज्जड ताकीद दिली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना पी. आय. दराडे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. शहरात व तालुक्यात पोलीस कोणाच्याही दबावाला बळी पडणार नसून, कायदा आणि सुव्यवस्थेशी खेळणाऱ्यांविरुद्ध कसलीही गय न बाळगता कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी या वक्तव्यातून दिला आहे.
पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा राजकीय व सामाजिक वजनाचा वापर करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांना पी. आय. दराडे यांच्या या वक्तव्याने थेट दणका दिला आहे.

खाकी वर्दी ही केवळ कायद्याचे पालन करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी बांधिल आहे, कोणाच्या वैयक्तिक मनमानी ‘फर्माईशी’ पूर्ण करण्यासाठी नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितले.
गेल्या काही दिवसांत पोलिसांच्या कामात निष्कारण ढवळाढवळ करणाऱ्या आणि कायद्याला खिशात घेऊन फिरणाऱ्या स्वयंघोषित भाई-दादांची खाकीचा हा कडक अवतार पाहून पुरती हवा टाईट झाली आहे. “पोलीस स्टेशन ही कोणाच्या खाजगी मालकीची जहागीर नाही,” असा थेट इशारा देत पी. आय. दराडे यांनी स्पष्ट केले की, दादागिरी, बेकायदेशीर धंदे आणि वशिलेबाजी खपवून घेण्याचा काळ आता संपला आहे. त्यांचा हा आक्रमक तेवर पाहता गुन्हेगारी जगतात प्रचंड घबराट पसरली असून, नेवाशात कायदा हातात घेणाऱ्यांची आता खैर नाही, असाच कडक इशारा यातून प्रशासनाने दिला आहे.

पोलीस निरीक्षकांच्या या आक्रमक आणि रोखठोक पवित्र्यामुळे नेवासा परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींचे धाबे दणाणले आहेत. तर सर्वसामान्यांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून, कायदा मोडणाऱ्यांवर आता पोलीस कशी कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थिनींची छेडछाड व टवाळखोरी रोखण्यासाठी शाळा-कॉलेज परिसरात पोलीस हेल्पलाईनचे बॅनर लावून विद्यार्थ्यांना ‘आयडी कार्ड’ सक्तीचे करण्याचे पत्र शाळांना दिले जाईल. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमिओंना चाप बसून छेडछाड व मारामारीचे प्रकार थांबतील.
— प्रताप दराडे (पोलीस निरीक्षक, नेवासा)


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







