Mahayuti Cabinet allocation : महायुती सरकारचा शपथविधी आज आझाद मैदानावर होणार आहे. मात्र, महायुती सरकारमध्ये कोणाची खाती कोणाच्या वाट्याला येणार, हे स्पष्ट नाही.अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवली.
Ajit Pawar : महायुती सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातला आहे. तत्पूर्वी आदल्या रात्री मुंबईत महायुतीच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवली. त्यामुळे काल रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडल्याचे सांगितले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपदं फायनल करा, त्यानंतर आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करु, असे अजित पवार(Ajit Pawar) यांनी भाजप नेतृत्त्वाला सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं कायम राहणार यासोबतच एकनाथ शिंदेना जितकी खाती मिळतील तितकीची खाती आम्हाला देखील मिळायला हवीत, ही आमची भूमिका कायम असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने दिली. अजित पवार यांच्या पक्षाकडून यंदा मंत्रिमंडळात जुन्याऐवजी नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
तत्पूर्वी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गुरुवारी सकाळपासून लगबग दिसत आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊन अजित पवारांचं अभिनंदन करत आहेत. आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची रीघ देवगिरी बंगल्यावर लागली आहे. दरम्यान, महायुतीच्या आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पुन्हा एकदा अमित शाह आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. यावेळी अमित शाह हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे. या बैठकीत गृहमंत्रीपदाबाबत काही चर्चा होणार का, हे बघावे लागेल.
राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
महायुती सरकारच्या आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फोन करुन आमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वैयक्तिक कारणामुळे आपल्याला शपथविधी सोहळ्याला येता येणार नाही, असे राज ठाकरे यांनी फडणवीसांना सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी फोनवरुन देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्याचे सांगितले जाते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.