
नेवासा – नेवासा नगरपंचायतीच्या ७ जुलै २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेबाबत नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना विरोधी गटाने सविस्तर पत्रक जाहीर करून उत्तर दिले आहे. विकासकामांना विरोध केल्याचा आरोप फेटाळून लावत, आपला विरोध हा केवळ नियमबाह्य आणि अपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेला असल्याचा दावा विरोधी गटाने केला.
पत्रकार परिषदेत विरोधी गटाने सांगितले की, निवडणुका संपल्यानंतर शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली होती. नगरपंचायतीत त्यांच्या गटाचे १० आणि नगराध्यक्षांच्या गटाचे ७ नगरसेवक असतानाही शहरहिताला प्राधान्य देत विकासनिधीचे ५०-५० टक्के वाटप करण्यास सहमती दर्शविण्यात आली होती.

त्यानुसार, सर्व प्रभागांतील विकासकामांचे प्रस्ताव नियमाप्रमाणे नगराध्यक्षांकडे सादर करण्यात आले. मात्र, ३ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अजेंड्यात त्यांच्या गटाने दिलेल्या एकाही विकास प्रस्तावाचा समावेश करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच, कोणत्या निधीतून कामे होणार, खर्चाचा तपशील, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, मुख्याधिकाऱ्यांचे टिपण तसेच संबंधित विभागांचे अभिप्राय यांसारखी आवश्यक माहिती अजेंड्यासोबत देण्यात आली नसल्याचेही विरोधी गटाने सांगितले. त्यामुळे २४ जून २०२६ रोजी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी हरकत नोंदवून संपूर्ण माहितीसह नव्याने अजेंडा प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली होती.

मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी उत्तरामध्ये अजेंड्यावरील टिपण्या तयार करण्याचे काम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. यावरून अजेंडा अपूर्ण असल्याचे प्रशासनाने अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचा दावा विरोधी गटाने केला. मात्र, सभा होईपर्यंत आवश्यक टिपण्या उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३ जुलैची सभा पुढे ढकलल्यानंतर ७ जुलै रोजी सभा घेण्यात आली. मात्र, त्याच अपूर्ण अजेंड्यावर सभा पार पडल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी विरोधी गटाने आणखी एक मुद्दा उपस्थित करत सांगितले की, २० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सोलर हायमास्ट, ड्रेनेज, पाणीपुरवठा, रस्ते आदी विकासकामांना बहुमताने मंजुरी देण्यात आली होती. मग तेच विषय पुन्हा “अर्जंट” म्हणून नव्याने सभेपुढे का आणण्यात आले, याचे स्पष्टीकरण नगराध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

“आमचा विकासाला विरोध नाही. नियमबाह्य, अपूर्ण आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता मांडलेल्या विषयांनाच आमचा विरोध आहे. सर्व नगरसेवकांना समान वागणूक, सर्व प्रभागांना न्याय्य निधी आणि संपूर्ण माहितीसह अजेंडा प्रसिद्ध झाल्यास शहराच्या विकासातील प्रत्येक ठरावाला आम्ही पूर्वीप्रमाणेच पाठिंबा देऊ,” अशी भूमिका विरोधी गटाने मांडली.
यावेळी २०१७ ते २०२२ या कालावधीतील तत्कालीन नगराध्यक्ष संगीता बर्डे यांच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख करण्यात आला. त्या काळात नगराध्यक्ष भाजपच्या तर बहुमत क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे असतानाही कोणताही भेदभाव न करता सर्व प्रभागांमध्ये समान विकासकामे करण्यात आली होती. सध्याच्या नगराध्यक्षांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असेही विरोधी गटाने म्हटले.

आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ विरोधी गटाने पत्रकारांना पाच महत्त्वाची कागदपत्रेही सादर केली. त्यामध्ये १५ जून रोजी सादर केलेले विकासकामांचे प्रस्ताव, ३ जुलैच्या सभेचा अजेंडा, २४ जूनची लेखी हरकत, मुख्याधिकाऱ्यांना केलेली विचारणा आणि मुख्याधिकाऱ्यांचे लेखी उत्तर यांचा समावेश आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर नगराध्यक्षांकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी असून, नगरपंचायतीतील विकासकामांच्या प्रक्रियेवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







