घोडेगाव : राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे ४२ वा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू असून, सप्ताहाच्या चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर) यांच्या रसाळ व प्रभावी वाणीतून संपन्न झाली. परिसरातील हजारो भाविक भक्तांनी या कीर्तनसेवेचा लाभ घेतला.
यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या “गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद” या अभंगाचे निरूपण करताना महाराजांनी भक्ती, सदाचार आणि आध्यात्मिक जीवनाचे महत्त्व विशद केले. “जन्मोजन्मी गोड व्हावा भक्तीचा हा रस” असा संदेश देत त्यांनी भक्तीमार्गातून जीवनात समाधान आणि आनंद मिळतो, असे सांगितले.

कीर्तनातून मार्गदर्शन करताना ह.भ.प. विशाल महाराज खोले म्हणाले की, आजच्या युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून संतांच्या विचारांचा आणि सांप्रदायिक परंपरेचा स्वीकार करावा. “हरवलेला सद्गुण पुन्हा जागेवर आणण्यासाठी कीर्तन आणि संतविचारांची गरज आहे. युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून भक्तीमार्गाकडे वळावे; जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, आपल्या कीर्तनातील ‘पिंगळा’ या प्रभावी सादरीकरणाचा संदर्भ देताना विशाल महाराज खोले यांनी ‘पिंगळा’ प्रकरण महाराष्ट्रातच नव्हे, तर विदेशातही प्रसिद्ध झाल्याचे सांगितले. या प्रसंगातून त्यांनी संतविचार, भक्ती आणि जीवनातील सकारात्मक परिवर्तनाचा संदेश उपस्थित भाविकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.

अभंग, निरूपण आणि भक्तिरसपूर्ण विवेचनामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
या कीर्तनसेवेला गायनाचार्य ह.भ.प. कैलास महाराज पवार, ह.भ.प. ऋषिकेश महाराज शेटे आणि शिवाजी महाराज कापडी यांनी गायनाची साथ दिली. तसेच मृदुंगाचार्य ऋषिकेश फटांगरे आणि विष्णू गांडुळे यांनी मृदुंगाची उत्कृष्ट साथ देत कीर्तनसेवा अधिक रंगतदार केली.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गुंजाळे येथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







