
नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराडे यांच्याविरोधात सुरू असलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होण्यासाठी, अंतिम निर्णय व आवश्यक कारवाई होईपर्यंत त्यांना नेवासा नगरपंचायतीच्या कार्यभारापासून दूर ठेवावे अथवा अन्यत्र बदली करावी, अशी मागणी नेवासा नगरपंचायतीच्या ११ नगरसेवकांनी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्याधिकारी श्री. निखिल फराडे यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध गंभीर तक्रारी व अनियमिततेचे आरोप समोर आले असून, संबंधित प्रकरणांची शासकीय स्तरावर चौकशी सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, नगरपंचायतीतील प्रशासन, विकासकामे, आर्थिक व्यवहार, निविदा प्रक्रिया, सर्वसाधारण सभा, लोकप्रतिनिधींना माहिती उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या नियमांचे पालन याबाबत प्रश्न निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाची चौकशी सुरू असताना संबंधित अधिकारी त्याच पदावर कार्यरत राहिल्यास चौकशीवर प्रभाव पडण्याची, शासकीय कागदपत्रांमध्ये हस्तक्षेप होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने चौकशीची निष्पक्षता अबाधित ठेवण्यासाठी त्यांना कार्यभारापासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून निष्पक्ष चौकशी व योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही नगरसेवकांनी केली आहे.

या निवेदनावर उपनगराध्यक्ष सौ. शालिनी संजय सुखदान, गटनेते जितेंद्र भाऊसाहेब कुऱ्हे, जयश्री चंद्रकांत शिंदे, संभाजी शिवाजी धोत्रे, स्वप्नील (सागर) राजेंद्र मापारी, शहिदबी इनायत खान पठाण, सोनल राहुल चव्हाण, नसरीन मुस्तार शेख, शोभा प्रताप व्यवहारे, प्रतिमा जातिंदर गवळी आणि स्वीकृत नगरसेवक राजेंद्र कारभारीकाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







