शिरेगाव (अविनाश जाधव) – जाती-धर्माच्या भेदभावाच्या भिंती पाडून “माझी जात – मानव” ही घोषणा करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदळा गावाने संपूर्ण देशासमोर सामाजिक समतेचा अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रक्तदान शिबिरानंतर झालेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने पारित केलेल्या ऐतिहासिक ठरावाने हे गाव महाराष्ट्राचे आणि भारताचे पहिले अधिकृत जातमुक्त गाव बनले.
रयत शिक्षण संस्थेच्या रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या ‘विचारवेध विद्यार्थी मंच’ने आयोजित शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी या गावाचा थेट अनुभव घेतला. राज्यशास्त्राच्या पुस्तकातील तत्त्वज्ञान प्रत्यक्षात जगलेले पाहून ते भारावून गेले. ही सहल केवळ शैक्षणिक नव्हती, तर सामाजिक जागरूकतेची आणि वैचारिक क्रांतीची ठरली.
प्रा. डॉ. मेघराज एकनाथ औटी (राज्यशास्त्र विभागप्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सरपंच शरदराव आरगडे यांची भेट घेतली. सरपंच शरदराव आरगडे म्हणाले, “५ फेब्रुवारीला रक्तदान शिबिरानंतर ग्रामसभेत हा ठराव पारित झाला. आता गावात कोणाची ओळख जातीने होणार नाही तर फक्त माणूस म्हणून होईल. सार्वजनिक ठिकाणे, शाळा, मंदिरे, विहिरी, स्मशानभूमी सर्वांसाठी समान. जातीय अपशब्द, भेदभाव किंवा सोशल मीडियावर असे संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाई होईल. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन, हुंडाविरोधी मोहीम आणि सामाजिक सलोखा यांना बळकटी देणारा हा निर्णय आहे.”
गावाने यापूर्वी शिवीगाळबंदी आणि विधवा सन्मानासारखे पुरोगामी ठराव केले होते; जातमुक्त गाव हा ठराव मात्र सामाजिक क्रांतीचा कळस ठरला. अभ्यास सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय प्रेरणादायी होत्या. एका वयोवृद्ध ग्रामस्थाने सांगितले, “आमच्या मुलांना आता जात नाही, फक्त माणूस म्हणून ओळख आहे. दैनंदिन जीवनात जातीची गरजच भासत नाही.”

गावातील शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांनी पाहिले की, मुले एकत्र शिकतात, खेळतात, जेवतात हे साधे दृश्य आता क्रांतीचे जिवंत प्रतीक बनले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे २,५०० असून, शेती मुख्य व्यवसाय असला तरी भविष्यातील पिढ्यांसाठी हा ठराव घेण्यात आला.
शाहू-फुले-आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित भारतीय संविधानातील ‘जात म्हणजे मानवता’ हे मूल्य सौंदळाने प्रत्यक्षात उतरवले आहे. ही सहल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व चेअरमन, रयत शैक्षणिक संकुल, श्रीरामपूर, माननीय मीनाताई जगधने यांच्या प्रेरणेने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण बडधे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. प्रा. डॉ. मेघराज औटी , प्रा. राहुल राऊत, प्रा. कल्पना कांबळे आणि प्रा. रवींद्र आदमाने यांनी विशेष परिश्रम घेतले.
“संविधान वाचले होते, पण आज ते जगताना पाहिले. सौंदळाने आम्हाला खरे शिक्षण दिले — समता आणि बंधुता प्रत्यक्षात कशी साकारता येईल.” रीया पाटणी, सहभागी विद्यार्थीनी, बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर
सौंदळा आता देशासाठी प्रेरणास्थान ठरले आहे. महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालये, संस्था आणि सामाजिक संघटनांनी या गावाला भेट देऊन हा आदर्श आपापल्या भागात रुजवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. एका छोट्या गावाने जे शक्य केले, ते संपूर्ण देश करू शकतो फक्त इच्छाशक्ती आणि एकजूट हवी!
या भेटीच्या प्रसंगी प्रा. डॉ. मेघराज एकनाथ औटी यांनी सौंदळा ग्रामपंचायतीचे रयत शिक्षण संस्थेच्या रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








