
नेवासा – नेवासा शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या गंभीर समस्यांवरून आम आदमी पक्षाने नेवासा नगरपंचायतीला थेट इशारा दिला आहे. शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था सुरळीत न झाल्यास सोमवार, दि. १५ जून २०२६ पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते संदिप दिलीप आलवणे यांनी दिलेल्या निवेदनात नेवासा शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवेदनानुसार, नगरपंचायतीचे अधिकारी व पदाधिकारी शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः विवेकानंद नगर व उपनगरांमध्ये पाणीटंचाई आणि अस्वच्छतेची समस्या अधिक गंभीर बनली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने शहरातील नागरिकांना सोबत घेऊन १५ जून रोजी आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस नेवासा नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.




कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







