सोनई – संदिप दरंदले-सरदार माणकोजी दहातोंडे यांच्या वारसदार जाबाज साखरबाई आप्पासाहेब दरंदले (चपळे) यांना देवाघरी जाऊन वर्ष झाले. यानिमित्त त्यांचे मुले ओंकार दरंदले,सदाशिव दरंदले आणि संतोष दरंदले यांनी आपल्या आईच्या आठवणीला उजाळा दिला. साखरबाईंचा जन्म चांदा येथे १९३७ साली झाला. बाईंचे लहानपणी अतिशय लाड झाले. घोड्यावर बसणे, मुलाप्रमाणे कपडे घालणे, पाटलाची पोर म्हणून सर्व गावात, दुकानात लाड केले जात. बाईंचे शिक्षण ४थी झाले. बाईंच्या पाठीवर सहा मुली झाल्या. परंतु लाडकी फक्त साखरबाई. बाईंना लहानपणी जर्दाळू, खीसमिस खूप आवडत होते. बाईंनी वडिलांबरोबर लहानपणी लोकनाट्य सुद्धा पाहिले.वय १६ झाल्यावर लग्नाचे वेध लागले.
उद्धवराव, माधवराव, मुरलीधर चपळे सोनाईहून पाहण्यास आले. पाहुण्यांसाठी लाडूचे जेवण, रांगोळ्या, थाटमाट केला होता. लग्न जमल्यावर २५ गाड्या वऱ्हाड, चौथ्या मांडीची हळद असल्याने २ दिवस वऱ्हाड चांदा येथे होते. दोन दिवस जेवणाची व बैलांची चोख व्यवस्था होती. आई लग्न होऊन सोनईला आल्यावर खरा जीवनाचा संघर्ष सुरू झाला. आईने लहानपणी काहीच काम केले नसल्याने काम जमेना. मोठे कुटुंब असल्याने बोलणे खावे लागत. बाईंना तीन मुले ओंकार, सदाशिव, संतोष व एक मुलगी ऊषा झाली.कुटुंबाची अतिशय हलाखीची परिस्थिती. वडील आप्पासाहेब म्हणजे आमचे भाऊ. भाऊ स्वभावाने गरीब असल्याने संसाराचा सर्व गाडा बाईंना ओढावा लागला.
फाटके थिगल्याचे लुगडे घालून संसार चालू झाला. वाटणी झाल्यावर एक पायली धान्य वाट्याला आले. राहण्यासाठी घर नव्हते. मळ्यात कुडाचे सप्पर बांधून राहत होतो. पाटलाची लाडकी लेक परंतु परिस्थितीने सर्व कामे करण्यास सुरवात केली. लोकांचे खुरपणे, सोंगणी, कापूस वेचणी, शेंगा काढणे, सर्व मजुरीचे कामे बाई आणि भाऊंनी केली. मुलांचे शिक्षण झाले पाहिजे म्हणून मला शाळेत घातले. बाईं म्हणायच्या शाळा शिकल्याशिवाय साहेब होणार नाही. बाई सर्व कामात तरबेज होत्या. शेतीची कामे व इतर सर्व कामात तरबेज होत्या. मळ्यातील दादा त्यांना वाघीण म्हणत असे. भरत काम, गायन, राजकीय चर्चेत नेहमी पुढे असतं. घरदार नेहमी स्वच्छ ठेवणे, टापटीप ठेवणे सवय होती. बाईंना अपमान सहन होत नव्हता.पहाटे दोन वाजता उठून मुलांच्या शिक्षणासाठी नगरला डब्बे पाठवले.
शिक्षणासाठी पैसे नसल्यास शेळया, कोंबड्या, भांडी गहाण टाकून शिक्षण पूर्ण केले. कारखाना झाल्यावर माझा एक मुलगा तिथे नोकरीस लागावा अशी बाईंची ईच्छा होती व त्याप्रमाणे झाले देखील. बाईंचे स्वप्न साकार झाले. अश्या अनेक मातांचे स्वप्न गडाख साहेबांनी साकार केले. बाई शेवटपर्यंत काम करत होत्या. बाईंना सर्व नातेवाईकांची माहिती होती. कुठल्याही गावाचे नाव घेतले की तेथील नातेवाईक सांगत असे. माणकोजी दहतोंडेची मी वारसदार आहे असे म्हणत व याबद्दल त्यांना भूषण वाटत असे.कीर्तनात सांगितले जाते आईवडिलांची सेवा करा. प्रत्यक्ष आम्ही तीन भावांनी व बहिणीने आई वडिलांची सेवा केली. त्यांना चारधाम दोन वेळा दाखवले. त्यांची परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ८६ वर्ष वयात आजारपणाने १ महिन्यात बाईंना देवाघरी जावे लागले. आज एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने अश्या आमच्या जाबाज बाईंना शतश: नमन.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.