नेवासा – बोगस कामगार नोंदणी करणाऱ्या एजंट ठेकेदार व सरकारी कामगार अधिकारी व त्यांचे कंत्राटी कर्मचारी यांच्या अभद्र युतीमुळे खरा कामगार अक्षरश: भरडला जात आहे. यापूर्वी केलेल्या सर्व तक्रारींच्या नुसार बोगस बांधकाम कामगार नोंदणी रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असे निवेदन समर्पण फाउंडेशन ने सहाय्यक कामगार आयुक्त यांना पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील बांधकाम मजुराला आर्थिक स्थैर्य यावे तसेच त्याच्या पुढच्या पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व मजुराला विमा संरक्षण असावे यासाठी विविध कल्याणकारी अशा २८ योजना राज्यात राबवण्यात येत आहे.
सेवाभावी संस्था व कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटना यांच्या सह केलेल्या अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोना महामारी नंतर कल्याणकारी योजना राबवण्यामध्ये शासनाला सुसूत्रता निर्माण करण्यात यश मिळाले. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली. परंतु याच कालखंडात योजना पुरवणारे ठेकेदार व सरकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या लालसेने बांधकाम कामगार मंडळामध्ये “एजंट राज”सुरू झाले. त्याचे बिसूर दुष्परिणाम आता अहिल्यानगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यामध्ये दिसू लागले आहेत. एकीकडे खऱ्या कामगारांना ग्रामपंचायतीकडुन ९० दिवसांचा दाखला मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. तर दुसरीकडे ज्यांचा बांधकामाशी काहीही संबंध नाही अशा लोकांकडे अगदी बिनबोभाफाटपणे सुरक्षा संच, भांड्यांचा संच, शिष्यवृत्ती वगैरे योजना घरपोच दिल्या जात आहेत.
मध्यमवर्गीय लोकांचा मोठ्या प्रचंड प्रमाणात योजना लागण्यामध्ये सहभाग आहे. यामुळे खऱ्या कामगाराने घाम गाळून उभे केलेले मंडळ त्याच्या काहीही कामात येत नाही ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीशी अतिशय गांभीर्याने लढा देण्याचे काम समर्पण फाउंडेशन ने सुरु केले आहे.बऱ्याच ठिकाणी एजंट लोकांनी बांधकाम मजुर म्हणुन लोकांची नोंदणी करुन देण्यासाठी दुकाने थटली आहेत. इंजिनीयर व ग्रामसेवकांचे बनावट शिक्के तयार करून हजारांवर बांधकाम मजुर तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. ही बाब पंचायत समिती प्रशासनाच्या व सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या लक्षात आणून दिली असता तेही साळसुदपणाचा आव आणत आहेत. यावरुन एजंट व सरकारी यंत्रणा यांची काहीतरी मिलीभगत व आर्थिक तडजोड असल्याचा समर्पण फाउंडेशन चा दावा आहे.
मागील आठवड्यात बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बांधकाम मजुरांच्या नूतनीकरणाच्या व नोंदणीच्या पैसे भरण्याच्या सुमारे 2100 पावत्या एजंट कडे सुपूर्त केल्या. त्या एजंट ने कामगारांचे रक्त तपासणी करण्याचे कंत्राट घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडे पावत्या दिल्या. त्या पावत्यांच्या आधारे रक्ताचे नमुने गोळा केले गेले. त्यानंतर कामगारांकडून सुमारे शंभर रुपये प्रत्येकी असे सक्तीने वसूल करण्यात आले. अशाप्रकारे प्रत्येक योजनेमागे सुमारे ३० टक्के कमिशन घेऊन कामगारांचे लूट करण्यास प्रकार राजरोसपणे सुरू आहे. सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर यांनी यापूर्वी केलेल्या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने बोगस बांधकाम कामगार नोंदणी रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच एजंट वरही नियमाप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करावी. अशी मागणी समर्पण फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसात जर आमच्या मागणीत कामगार विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर बोगस कामगार नोंदणी व एजंट विरोधात तालुकास्तरीय मोठे आंदोलन उभे केले जाईल याची नोंद घ्यावी.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.