नेवासा – नेवासा शहराच्या पूर्वेस नेवासाफाटा रोडवर असलेल्या जागृत अशा पावन गणपती मंदिरामध्ये शनिवारी पुष्पवृष्टी करून गणेश जयंती साजरी करण्यात आली.यावेळी गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
पावन गणपती मंदिराचा पाचवा वर्धापनदिन व गणेश जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन देवगड दत्तपिठाचे महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेने व संतसेवक हभप नारायण महाराज ससे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.गणेश जयंतीच्या निमित्ताने दीपक शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य भानसहिवरा येथील पुरोहित राजू गुरू जोशी यांनी केले.
नवसाला पावणारा नेवाशाचा पावन गणपती अशी ओळख या देवालयाची आहे.गणेश जयंती निमित्ताने पिचडगाव येथील माऊली आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचे गणेश जन्मावर किर्तन झाले. श्री पावन गणपती मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अँड.सुखदेव वाखुरे,अँड.नरेंद्र लोंढे,अँड.बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी व शंखनाद करत मंगलमूर्ती मोरया,गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत विघ्नहर्त्या गणरायाचा जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. उपस्थित भाविकांना ओस्तवाल परिवाराच्या वतीने शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गणेश जयंती निमित्ताने हजारो भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती,नवसाला पावणारा पावन गणपती अशी या देवस्थानची महती असल्याने शेकडो भाविकांनी येथे सपत्नीक अभिषेक घातले.दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. नव्याने मंदिर बांधून पाच वर्षे झाले असल्याने पाचव्या वर्धापनदिनानिमित्त पावन गणपती मंदिरावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर सभामंडप व परिसर पुष्प माळा व रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आला होता.नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी पावन गणपतीला अकरा,एकवीस अशा श्रीफळांची माळ अर्पण केली.दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.रात्री उशिरापर्यंत येणाऱ्या भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरूच होता.मंदिर पुजारी दत्तात्रय गायकवाड,संपतराव कडू पाटील,दत्तू महाराज व्यवहारे यांच्यासह विश्वस्त मंडळींनी येणाऱ्या भाविकांना सेवा देत स्वागत केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.