नेवासा – नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे “नाथांच्या नावानं चांगभल”चा असा जयघोष करत सलग पाच पौष रविवार यात्रा उत्सवाची उत्साहात सांगता करण्यात आली.पाच पौष यात्रा उत्सव कालावधीत लाखो भाविकांनी जागृत श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले. नेवासा शहराच्या उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर असलेले बहिरवाडी हे श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे.श्री क्षेत्र देवगडचे महंत राष्ट्रीय संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने या क्षेत्राचा दिवसेंदिवस कायापालट होत आहे.पौष महिन्यात येणारे रविवार हे नवसाचे मानले जात असल्याने पौष महिन्यातील पाच ही रविवारी मोठी यात्रा भरली होती. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले.
पूर्वी येथे श्री कालभैरवनाथांना पशू बळी दिला जायचा मात्र भगवंत भावाचा भुकेला असून मुक्या जीवाला बळी न देता श्री कालभैरवनाथांना आवडता डाळ रोडग्याचा नैवैद्य देवाला भाविक येथे अर्पण करून नवसपूर्ती करतात.गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी बाबांनी प्रबोधन व जनजागृती केल्यानंतर येथे बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली असल्याने आज भाविक श्रद्धेने तीन दगडांची चूल तयार करून पेटलेल्या गोवऱ्यावर रोडगा भाजून श्री कालभैरवनाथांना दाळ रोडग्याचा नैवैद्य अर्पण करतात.
गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेने येथे विविध विकास कामे मार्गी लागलेली आहे तसेच त्यांनी केलेल्या आवाहनानुसार भक्तांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाचे उभारण्यात आलेले भव्य मंदिर तसेच नुकतेच बांधण्यात आलेले प्रवेशद्वार भाविकांचे आकर्षण ठरले होते.नव्या मंदिरात काळा पाषाण असलेली मूर्ती दर्शनासाठी स्थापना करण्यात आली असून याच मंदिराच्या पाण्याखाली श्री कालभैरवनाथांची पूर्वीची मुख्यमूर्ती आहे.या दोन्ही ठिकाणी भाविकांनी शिस्तीचे पालन करून दर्शन घेतले.
पौष महिन्यात पाचव्या रविवारी भाविकांनी दर्शनासाठी येथे मोठी गर्दी केली होती.सर्वांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून विविध तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सेवेकरी बनून स्वयंसेवकाची भूमिका पार पाडली. बंदोबस्त करण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशनसह पोलीस मित्र संघटना व जनरक्षक संघटनेच्या जवानांनी सेवा दिली. ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी देखील सेवेच्या माध्यमातून योगदान दिले.
पाचव्या पौष रविवार निमित्त श्री कालभैरवनाथांच्या मंदिर प्रांगणात प्रसादालये,मिठाई, खेळणी गृहपयोगी वस्तूंच्या विविध दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्याने तीर्थक्षेत्र बहिरवाडीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.पौष महिन्यातील दर रविवारी बहिरवाडी येथे यात्रा भरत असल्याने त्या दृष्टीने उत्कृष्ट नियोजन, प्रसाद व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था श्री कालभैरवनाथ देवस्थान, तरुण मंडळे,ग्रामस्थांसह विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.या कालावधीत अन्नदान करणाऱ्या भाविकांचा विश्वस्त मंडळींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पौष यात्रा उत्सव काळात रस्त्याच्या पडझडीमुळे फारच हाल झाले या रस्त्यासाठी निधी मंजूर असल्याचे कळते मात्र रस्त्या डांबरीकरणाचे घोडे अडले कुठे असा प्रश्न येथील ग्रामस्थांसह भाविकांना देखील पडला आहे,तीर्थक्षेत्र बहिरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास त्वरित सुरुवात करावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.