नेवासा- विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीसाठी लाडक्या असलेल्या बहिणी आता निवडणुकीनंतर दोन महिन्यांत दोडक्या ठरल्या आहेत. महिला आणि बालविकास विभागाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील तब्बल पाच लाख अपात्र बहिणींना वगळले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारचे महिन्याला ७५ कोटी रुपये वाचणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका बसल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याचा सन २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जुलै २०२४ पासून या योजनेत अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये जमा करण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत ही योजना, महायुतीसाठी गेमचेंजर ठरली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा वार्षिक ४८ हजार कोटींचा खर्च राज्य सरकारच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने राज्य सरकारने या योजनेचा आढावा घेऊन सुरु केला होता. योजनेत अनेक अपात्र महिलांचा समावेश झाल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी एक्स या समाज माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पाच लाख अपात्र महिलांना वगळण्यात येत असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारच्या २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तरीही सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.