नेवासा – अहिल्यानगर परिसरातील शहर मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभानिमित्ताने होणारा डीजेचा दणदणाट रोखण्यासाठी शहर पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहा ते रात्री १० यावेळेत मर्यादीत आवाजात डीजे वाजला पाहिजे. व रात्री १० नंतर डीजेला बंदी घालण्यात आली आहे. जर रात्री १० नंतर डीजे वाजल्यास संबंधित डिजे चालक-मालक, मंगल कार्यालयाचे चालक-मालक यांच्यासह वधू-वर व त्यांच्या माता-पित्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गेल्या शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात शहरातील मंगल कार्यालयांचे चालक, मालक व मॅनेजर यांची तर मंगळवारी डिजे चालक-मालक यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या असून नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये आहेत. नगर-मनमाड रस्ता, स्टेशन रस्ता, टिळक रस्ता, छत्रपती संभाजीनगर रस्ता, कल्याण रस्ता, पाईपलाईन रस्ता, पुणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये आहेत. सध्या लग्न सराई सुरू आहे. त्यामुळे त्या परिसरात मोठी वर्दळ राहते. शहरात जागोजागी वाहतूक कोंडी होते. शक्यतो सर्वच विवाह सोहळे रात्रीच्यावेळी असतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत डीजेचा दणदणाट आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असते.

त्यामुळे परिसरातील नागरिकांना झोपा लागत नाही. तर, सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा काळ असून, विद्यार्थ्यांना अभ्यासही करता येत नाही. यासंदर्भात पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पोलीस दल अॅक्शन मोडवर आले आहे. डीजेचा आवाज, वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यांबाबत मंगल कार्यालय चालकांना सूचित केले आहे. यावरही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेचा आवाज असला पाहिजे, असेही सांगण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्यास डीजे चालक, मंगल कार्यालय चालक, वधु-वरांसह माता पित्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. याबाबत पोलिसांनी मंगल कार्यालय चालक, डिजे मालक यांना नोटिसा बजावल्या आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.