सोनई – नेवासा तालुक्यातील वांजोळी गावातील मोरयाचिंचोरे रोडवरील दाणी वस्ती येथे रविवारी ( दि.१६) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी पती पत्नीस धारदार शस्त्राने जबर मारहाण करीत एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेत पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताचस्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अधिकारी, सोनई पोलिसांचे पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शांताराम विठ्ठल दाणी ( वय ५५) हे आपल्या पत्नीसह घराच्या पडवीत झोपले होते. यावेळी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांना पडवीतील पलंगावर झोपलेल्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा ते उठले असता त्यांना चौघेजण आपल्या आजूबाजूला उभे असल्याचे दिसून आले. यावेळी चौघांनी त्यांना तलवार आणि चाकूने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये शांताराम दाणी यांच्या डोक्यावर वार करण्यात आले तर त्यांच्या पत्नीला उजव्या हाताला चाकूचा वार करत अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून घेतले. त्यानंतर दोघे चोर घरात घुसले त्यांनी शांताराम दाणी यांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावत घरातील महिलेचे गळ्यातील अर्धा तोळा व कानातील सोन्याचे दागिने आणि मुलाकडील मोबाईल व गळ्यातील सोन्याचा ओम असा जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला, तसेच जीवे मारण्याची धमकी देत तेथून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पहाटे सोनई पोलिस ठाण्याचे सपोनि विजय माळी, पीएसआय सुरज मेढे आपल्या पथकासह गावात दाखल झाले. यावेळी श्वानपथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. रविवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत पथके तपासाच्या दृष्टीने रवाना केली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबुर्मे पोलिस उपाधिक्षक सुनील पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करत तपास पथकास सुचना दिल्या.

दरम्यान, वांजोळी गावात यापुर्वीही चोरीच्या घटना घडल्या असून वारंवार असे प्रकार घडत आहेत. कालच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच या घटनेतील आरोपींचा तातडीने तपास करावा अशी मागणी चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, सरपंच अप्पासाहेब खंडागळे, उपसरपंच मंगेश पागिरे, आदिनाथ काळे, राजेंद्र दाणी यांनी केली.
वांजोळी व पांढरीचा पुल परिसरात चोरी,रस्ता लूट अश्या घटना नित्याच्याच झाल्या असून पांढरीचा पुल येथे
कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.