नेवासा – नेवासा स्थित सराईत गुंड गुन्हेगार कृष्णा पुनमसिंग परदेशी वय 34 वर्ष रा. खळवाडी ता. नेवासा यास एमपीडीए कायद्या अंतर्गत नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठवला आहे. मागील एका वर्षात पाच गावगुंडांना तुरुंगांमध्ये डांबलं आहे, कृष्णा परदेशी हा पाचवा आहे.
कृष्णा परदेशी याचा 15 वर्षाचा गुन्हेगारी इतिहास आहे. 15 वर्षाच्या काळामध्ये पोलीस ठाणे नेवासा, गंगापूर इत्यादी पोलीस स्टेशनला त्याच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, खुनाचा प्रयत्न, शासकीय अधिकाऱ्यावर हल्ले करणे, वाळू चोरी इत्यादी स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी मागील वर्षी पोलीस ठाणे नेवासाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा गुंडगिरी करणाऱ्यांना कायदेशीर धडा शिकवू असा निर्वाणीचा ईशारा दिला होता.
कृष्णा परदेशी याच्यावर अनेकदा वेगवेगळ्या प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्यावर या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही अनुकूल परिणाम झाला नाही. त्यामुळे मागील वर्षी पोलीस ठाणे नेवासा येथे नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी अशा गावगुंडांना धडा शिकवण्याचा सक्त ईशारा दिला होता. कृष्णा परदेशी याचावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव व मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्फतीने मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी अहवाल स्वीकारून कृष्णा परदेशी यास एमपीडीए कायद्याअंतर्गत तुरुंगात धाडण्याचा आदेश मागील नोव्हेंबर महिन्यात केला होता. परंतु कृष्णा परदेशी यास एमपीडीए आदेशाची भनक लागताच भूमिगत झाला होता. तेव्हा पासून नेवासा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रात्रंदिवस त्याच्या मागावर होती.

कृष्णा परदेशी अनेक दिवस लपून-छपून रहात होता. स्वतःचे मोबाईल बंद केले होते. परंतु तो दुसऱ्या मोबाईलचे इंटरनेट घेऊन व्हाट्सअपचा वापर करीत होता, याचाच आधार घेऊन नेवासा पोलिसांनी काही तांत्रिक विश्लेषण करून कृष्णा परदेशी नेवाशात आल्याची खात्री पटताच त्याचे राहते घरी काल रात्री शीघ्रगतीने छापा घालून त्यास सीताफिने ताब्यात घेतले होते.
काल रात्री प्राथमिक स्वरूपाची कार्यवाही करून कृष्णा परदेशी यास पोलीस उपनिरीक्षक भोंबे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे या विशेष पथकाच्या सहायाने आज पहाटेच मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. मागील एक वर्षातील एमपीडीए अंतर्गत तुरुंगात डांबलेला हा पाचवा सराईत गुंड आहे.
वारंवार कायदा व सु-व्यवस्था बिघडवणाऱ्याची गय केली जाणार नाही असा सक्त इशारा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
सदरची कारवाई सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव, श्री. वैभव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक जरे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, अवि वैद्य, अमोल साळवे यांनी सिताफिने पार पाडली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.