संभाजी माळवदे : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
नेवासा – नेवासा फाटा परिसरासह तालुक्यात अतिक्रमणामुळे विस्थापित झालेल्या सर्व व्यावसायिकांचे पुनर्वसन होईपर्यंत वित्तीय संस्थांकडून होणारी कर्जवसुली वर्षभर थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, शहराध्यक्ष अंजुम पटेल, बसपचे हरीश चक्रनारायण यांनी व्यावसायिकांसह जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. शासनाकडून संपूर्ण राज्यभर शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तातडीच्या नोटिसा व तातडीची कारवाई यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे व्यवसाय उदध्वस्त होऊन “होत्या चे नव्हते” झाले आहे. या व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच वित्तीय संस्थादेखील आपण दिलेले कर्ज आता बुडते की काय या भीतीने वसुलीसाठी सरसावल्या आहे.

यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, मल्टिस्टेट, पतसंस्था, विविध फायनान्स कंपन्या यांचा समावेश आहे. त्यांनी अतिक्रमण दुकाने पडलेल्या व्यापाऱ्यांना कर्ज हप्त्याचा तगादा सुरू केला आहे. त्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. अतिक्रमण हटविल्याने व्यवसाय उदध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांपुढे कर्ज हप्ता भरण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. व्यापाऱ्यांच्या या समस्याची गंभीर दखल घेत आज प्रदेश काँग्रेसच्या कामगार विभागाचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ज्या व्यापाऱ्यांची अतिक्रमणांमध्ये दुकाने काढण्यात आली त्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय स्थिर होईपर्यंत साधारण एक वर्षाच्या कालावधीसाठी वित्तीय संस्थाकडून त्यांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सवलत द्यावी व तसा आदेश वित्तीय संस्थांना द्यावा, अशी मागणी केली.
हा प्रश्न राज्यभराचा व धोरणात्मक असल्यामुळे या प्रश्नाबाबत राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्याशी संवाद साधून राज्यभरासाठी हा निर्णय लागू करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, नेवासे काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, बसपाचे हरीश चक्रनारायण आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते व व्यापारी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.